Doctor प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

Ayushman Bharat Scheme: केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत (Ayushman Bharat Scheme) आता 70 वर्षांवरील वृद्धांना मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या कार्यक्रमांची आणि धोरणांची रूपरेषा राष्ट्रपती अभिभाषणातून देत होते. मुर्मू म्हणाल्या की. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत 55 कोटी लाभार्थी मोफत आरोग्य सेवा घेत आहेत. आयुष्मान भारत योजना आधीपासून सुरू आहे, आता 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीलाही या योजनेत समाविष्ट केले जाईल आणि त्यांना मोफत उपचाराचा लाभ मिळेल.

योजनेंतर्गत आयुष्मान कार्ड मिळाल्यानंतर कोणतीही व्यक्ती उत्तम वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहणार नाही. आयुष्मान कार्डधारकांना रूग्णालयात राहणे, जेवण आणि इतर सुविधांसह 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय सेवा मिळते. यासह देशात 25,000 जन औषधी केंद्रे सुरू करण्याचे कामही वेगाने सुरू असून, त्याद्वारे लोकांना स्वस्त दरात औषधे मिळतील, अशी माहितीही मुर्मू यांनी दिली.

आयुष्मान भारत योजना ही सार्वजनिक अर्थसहाय्यित आरोग्य विमा योजना आहे, ज्याचे उद्दिष्ट देशातील कमी उत्पन्न असलेल्या 12 कोटी कुटुंबांना दुय्यम आणि तृतीयक काळजी इस्पितळात भरतीसाठी दरवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच प्रदान करण्याचे आहे. योजनेअंतर्गत रुग्णालयांचा समावेश पॅनेलमध्ये करण्यात आला आहे. राज्य आरोग्य एजन्सीज (SHA) यांना योजनेअंतर्गत हॉस्पिटल एम्पॅनलमेंट आणि मॅनेजमेंट (HEM) मार्गदर्शक तत्त्वांनुसार रुग्णालयांच्या पॅनेलमेंटची जबाबदारी मिळाली आहे. (हेही वाचा: Cholera Cases in Maharashtra-Gujarat: महाराष्ट्र-गुजरातमध्ये कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ; पावसाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी)

यावेळी राष्ट्रपती म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानामुळे गरिबांच्या जीवनाचा सन्मान आणि त्यांचे आरोग्य हा राष्ट्रीय महत्त्वाचा विषय बनला असून, देशातील करोडो गरिबांसाठी प्रथमच शौचालये बांधण्यात आली आहेत. हे प्रयत्न आपल्याला खात्री देतात की, आज देश खऱ्या अर्थाने महात्मा गांधींच्या आदर्शांवर चालत आहे.