World's Hardest Restaurant to Get Reservation (संग्रहित संपादित प्रतिमा)

सर्वसामान्यपणे एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी आधी टेबल बुक करावे लागते. बरेचवेळा रेस्टॉरंटबाहेर वेटिंगही असते. भारतामध्ये हे वेटिंग जास्तीत जास्त 40 ते 50 मिनिटांचे असू शकते. मात्र युनायटेड किंगडममधील सेंट्रल ब्रिस्टलमध्ये असलेल्या ‘द बँक टॅव्हर्न पब’ (The Bank Tavern) मध्ये टेबल मिळवण्यासाठी तुम्हाला तब्बल 4 वर्षे वाट पहावी लागेल. होय, या ठिकाणी टेबल बुक करणे ही प्रचंड कठीण गोष्ट आहे. म्हणूनच या पबला ‘टेबल बुक करण्यासाठी जगातील सर्वात कठीण रेस्टॉरंट’चा किताब मिळाला आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक वीकेंडला आपले मित्र आणि जवळच्या लोकांसोबत पार्टी करतात. वीकेंडला पार्टीला जाताना अनेक बार, कॅफे आणि पबना आगाऊ बुकिंग करावे लागते. काही लोकप्रिय ठिकाणी, उशीर झाल्यास प्रवेश मिळणेही कठीण होते. जगातील काही निवडक प्रसिद्ध कॅफे, पब आणि बार यांसारख्या ठिकाणी लोकांना काही महिने आधीच बुकिंग करावे लागते. मात्र युनायटेड किंगडममधील बँक टॅव्हर्न पब या त्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षा कालावधीसाठी जगप्रसिद्ध होत आहे.

जर तुम्हाला रविवारी या छोट्या पबमध्ये पार्टी करायची असेल तर तुमचा नंबर चार वर्षांनीच येईल. या यूके पबमध्ये रविवारी पार्टी करण्यासाठी चार वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. याचा अर्थ आज किंवा उद्या जर कोणी बुकिंग केले तर त्याचा नंबर 2027 मध्ये येईल. कोरोना लॉकडाऊनमुळे या पबचा प्रतीक्षा कालावधी 4 वर्षांपेक्षा जास्त झाला आहे.

हा प्रसिद्ध यूके पब येथे येणाऱ्या पाहुण्यांना दर रविवारी आपला खास संडे रोस्ट सर्व्ह करतो आणि लोकांना तो इतका आवडतो की संडेसाठी टेबल बुक करण्याची मागणी येथे सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे पबला त्याच्या संडे रोस्टसाठी पुरस्कारही मिळाला आहे. ही पब डिश अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे आणि लोक ती खाण्यासाठी महिने आणि वर्षे वाट पाहत आहेत आणि या कारणास्तव त्याच्या प्रतीक्षा कालावधीने नवीन विक्रम केला आहे. (हेही वाचा: Worst Traffic In The World: जगातील सर्वात जास्त ट्रॅफिक जॅम असलेल्या शहरांची यादी जाहीर; टॉप 20 मध्ये भारतामधील चार शहरे, जाणून घ्या यादी)

दरम्यान, या पबच्या वेबसाईटनुसार, तो 18 व्या शतकापासून या ठिकाणी सुरू आहे. अनेक दंगली, दोन महायुद्धे, बदलले राजकारण, आपत्ती अशा अनेक घटनांचा साक्षीदार हा पब आहे.