Diwali 2020: कोविड-19 संकटात 'इम्यूनिटी बूस्टर मिठाई' चा नवा ट्रेंड; दिवाळी निमित्त वाढती मागणी
Representational Image | (Photo Credits: Pixabay)

गेल्या अनेक महिन्यांपासून देशावर घोंगावत असलेले कोविड-19 चे संकट अद्याप कायम आहे. या संकटाचा परिणाम सर्वच स्तरात, क्षेत्रावर झाला आहे. याचच परिणाम म्हणून हवायांनी इम्युनिटी बूस्टर मिठाई बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. या हेल्दी मिठाईला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. या मिठाईची खासियत म्हणजे यात सुंठ, तुळस, ओवा, वेलची, काळीमिरी, आलं, कलोजी, अश्वगंधा, हळद यांसारख्या औषधी पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस संकटकाळात लोक आपल्या आरोग्याप्रती अधिक सजग झाले आहेत. आहाराकडे अधिक लक्ष दिले जात आहे. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात या मिठाईला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच ही मिठाई लहान मिठाईच्या दुकानातून ब्रांडेड मिठाईच्या दुकानांत आणण्यात आली आहे.

फेडरेशन ऑफ स्वीट्स अॅण्ड नमकीन मॅन्युफॅक्चरर्स (FSNM) चे संचालक फिरोज नकवी यांनी या मिठाईबद्दल बोलताना सांगितले की, मिठाई बनवणारा माणूस कोरोना व्हायरसच्या लढाईत मागे नाही. लोकांच्या आरोग्याचा विचार करून त्यांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी मिठाई तयार केली आहे. मिठाईत हळद, वेलची, खोबरं यांसारखे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अनेक घटक त्याचबरोबर सुका मेवा यांचा वापर करण्यात आला आहे. काजू कतली, लाडू यांच्यासह विविध प्रकारच्या मिठाईत इम्युनिटी ब्युस्टर पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.

मिठास स्वीट्स एंड रेस्टोरेंट प्राइवेट लिमिटेड के एमडी पुष्पेंद्र शर्मा (Pushpendra Sharma)यांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीत सांगितले की, पीठ, बेसन, ड्राय फ्रुट्स यापासून तयार केलेल्या लाडू मध्ये इम्यूनिटी बूस्टर मटेरियलचा वापर केला आहे. इम्यूनिटी बूस्टर म्हणून मिठाईत सुंठ, तुळस, ओवा, वेलची, काळीमिरी, आलं, कलोजी, अश्वगंधा, देसी तूप, केशर यांचा वापर करण्यात येतो. दरम्यान, इम्युनिटी बूस्टर मिठाई विशेषत: लाडू यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. (Diwali 2020 Homemade Sweets: दिवाळीत यंदा घरच्या घरी काजू कतली, कलाकंद, खजूर बर्फी यांसारखे पदार्थ बनवून तोंड करा गोड, Watch Recipes)

दिवाळी म्हणजे फराळ, मिठाई, गोडाधोडाचे पदार्थ यांची रेलचेल. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे खाद्यपदार्थांची निवड करताना नागरिक अधिक चोखंदळ झाले आहेत. त्यामुळेच ही इम्युनिटी बूस्टर मिठाई उत्तम पर्याय ठरत आहे.