Healthy Breakfast: आरोग्यदायी नाश्ता, सकाळच्या न्याहारीचे 5 पर्याय
Healthy Breakfast | Representational image (Photo Credits: pixabay)

Healthy Indian Breakfast: तुम्ही सकाळी कितीही लवकर उठा आणि कामाला सुरुवात करा. सकाळचा नाश्ता अर्थातच न्याहरी जर दमदार आणि आरोग्यदायी असेल तर दिवसभर उर्जा मिळते. त्यामुळे ब्रेकफास्ट करताना अशाच गोष्टींना प्राधान्य द्या, ज्या तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतील. अनेकदा लोक न्याहरीसाठी बेकरी प्रॉडक्ट निवडतात. ते वाईट नसले तरी आरोग्यदायी असतातच असे नाही. त्यामुळे दिवसभर तुम्हाला साचलेपण, कंटाळा जाणवू शकतो. यासाठीच आम्ही येथे काही भारतीय पदार्थ सूचवत आहोत. जे आपल्याला सकाळच्या न्याहरीसाठी प्राधान्याने घेता येऊ शकतात.

पोहे (Poha)

Poha | Representational image (Photo Credits: pixabay)

पोहे हा सर्वत्र सहज उपलब्ध होणारा, पचायला हलका आणि कमी वेळात अधिक उर्जा देणारा आणि पोट भरणारा पदार्थ आहे. हा पदार्थ बनवायलाही सोपा आहे. तो बनविण्यासाठी लागणारे घटकही सहज उपलब्ध होतात. जसे की, पोहे, हळद, कांदा, तेल मोहरी. त्यामुळे झटपत बनणारा आणि आरोग्यदायी असलेला पदार्थ म्हणून आपण याकडे पाहू शकता.

उपमा (Upma)

Upma | Representational image (Photo Credits: pixabay)

पोह्याप्रमाणेच सहज उपलब्ध होणारा आणि कमी वेळात बणणारा पदार्थ म्हणजे उपमा. उपमा हादेखील एक गुणवत्तापूर्ण पदार्थ आहे. जो कडधान्याची डाळ, रवा आणि आवश्यकतेनुसार इतर भाज्या वापरुन तयार केला जातो. खास करुन हा पदार्थ सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा कोणत्याही वेळी खाता येतो.

इडली (Idli)

Idli | Representational image (Photo Credits: pixabay)

तुम्हाला दिवसाची सुरुवात जर हलकी आणि पौष्टीक करायची असेल तर आपण ईडली पदार्थाला नक्कीच प्राधान्य देऊ शकता. खास करुन हा पदार्थ उडीद डाळीचे पीठ, रवा यापासून बनवला जातो. सोबत नारळाची चटणी आणि सांबर यासोबत खाल्ला जातो. कमी वेळात हा पदार्थ तयार होतो. मात्र, त्यासाठी याला आदल्या दिवसापासून तयारी करावी लागते. अर्थात आपण जर हा पदार्थ बाहेरुन मागवणार असाल तर तुमच्या दिवसाची सुरुवात अतिशय उत्तम होऊ शकते.

ओट्स (Oats)

Oats | Representational image (Photo Credits: pixabay)

ओट्स हा एक चांगला नाष्टा आहे. जो तुम्हाला भरपूर प्रथिने (प्रोटीन्स), कार्ब आणि उर्जा देऊ शकतो. आजकाल बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे ओट्स मिळतात. जे आपण मसाले आणि पिनट बटर सोबत खाऊ शकता.

अंडी (Egg)

Egg | Representational image (Photo Credits: pixabay)

सकाळी सकाळी अंडी हा सुद्धा नाष्ट्याचा एक चांगला प्रकार आहे. ज्यामध्ये सर्वाधिक प्रथिने असतात. जो आपण पोळी बनवून किंवा थेट गरम पाण्यात उकडूनही खाऊ शकता. कमी कार्ब, गुणवत्तापूर्ण प्रोटीन्स आणि इतर आरोग्यदायी घटकांसाठी अंडी हा पर्याय अधिक सक्षम आहे.

आरोग्यदायी आहार हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. योग्य आहार हा आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे सकाळी नाश्ता दमदार असणे महत्त्वाचे ठरते. तुमच्या आहारतज्ज्ञाला ठरवून आपण योग्य तो नाष्टा ठरवू शकता.