श्रावण (Shravan) महिन्यात सोमवारला विशेष महत्त्व असते. वार प्रवृत्तिनुसार सोमवार हा हिमांशु अर्थात चंद्राचा दिवस देखील आहे. चंद्राच्या प्रार्थनेने तुम्ही शिवला प्रसन्न करू शकता कारण चंद्राचे स्थान हे शिवाच्या मस्तकावर आहे. सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो. मग, शंकराला खूश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहीत मुली उपवासदेखील करतात. त्यातल्या त्यात श्रावणातल्या सोमवारचे विशेष महत्व असते. या महिन्यात श्रवण नक्षत्र आकाशात दर्शन देत म्हणून याला श्रावण महिना म्हणतात.
श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. शिव आणि पर्वती यांचा विवाह श्रावण महिन्यात झाला होता त्यामुळे शंकराला हा महिना अतिशय प्रिय आहे. तसेच याच महिन्यात समुद्र मंथन घडले होते ज्यातून बाहेर पडलेले हलाहल विष शंकराने प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना शांत करण्यासाठी सर्व देवतांनी त्यांच्यावर जलाचा अभिषेक केला होता म्हणून श्रावण महिन्यात आणि सोमवारी शंकराच्या अभिषेकाचे महत्व आहे. (हेही वाचा: श्रावण महिन्यातील मंगळागौर का आहे नवविवाहितेसाठी खास; यंदा कधी कराल साजरी?जाणून घ्या)
श्रावण कथा - देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळवण्याचा प्रण करून आपले पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला. त्यानंतर तिने आपल्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रुपात जन्म घेतला. दुसऱ्या जन्मात पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न करून घेतले. शंकर भगवानही प्रसन्न झाले व त्यांनी पर्वतीशी विवाह केला. या घटनेनंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला. यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात.