Shravan Manglagaur 2019: श्रावणाची (Shravan) चाहूल लागताच सणांची रेलचेल सुरु होते, चोहीकडे हिरवळ दाटली असताना मन ही कसं प्रसन्न होऊन बागडायला लागतं. बहुदा हाच उत्साह लक्षात घेऊन श्रावणात मनसोक्त आनंद लुटण्यासाठी मंगळागौर (Manglagaur) कार्यक्रमाची सुरुवात झाली असणार. पूर्वीच्या काळी, चूल- मूल सांभाळत, रांधा, वाढा उष्टी काढा या नित्यक्रमात अडकलेल्या विवाहितेला काही क्षण का होईना सुट्टी मिळावी म्हणून श्रावणात एक माहेरची वारी व्हायची. माहेरी आल्यावर श्रावणी मंगळवारी मंगळागौरीच्या व्रताच्या निमित्ताने बालपणीच्या मैत्रिणीची भेट व्हायची. मग काय व्रताची पूजा आटोपली की कधी एकीची टेर ओढत तर दुसरीची मस्करी करत, अमकीच्या सासरच्या गंमतीजंमती आणि तमकीच्या सासूच्या तक्रारी ऐकत धम्माल व्हायची, सोबतच नटून थटून गाणी म्हणत फुगड्या घालत रात्र जागवण्याच्या स्वरूपात मंगळागौर पार पडायची. यंदा 2ऑगस्ट पासून श्रावण सुरु होणार असून 6 ऑगस्ट ला पहिला श्रावणी मंगळवार आहे. या निमित्ताने यंदा तुम्हीही श्रावणी मंगळागौर साजरी करण्याचा विचार करत असाल तर या व्रताचे महत्व आणि वेळापत्रक जरूर जाणून घ्या..
मंगळागौर व्रत का करावे?
मंगळागौर हे नवविवाहितेने करण्याचे व्रत आहे. नवविवाहितेला अखंड सौभाग्य व तिच्या सासर-माहेरास सुखसमृद्धी लाभावी या भावनेने व्रत केले जाते.भगवान शंकराची पत्नी गौरी हिच्या पूजेचे हे व्रत आहे. आणि श्रावण महिन्यातील मंगळवारी केले जाते म्हणून त्यास मंगळागौरी असे म्हटले जाते. साधारणतः लग्नानंतर पहिली पाच वर्ष हे व्रत करायचे असते पण अलीकडे हौस म्हणून अनेक घरांमध्ये मंगळागौर केली जाते. रूढीनुसार एक मंगळागौर माहेरची व एक सासरची अशी साजरी केली जाते. व्यावहारिक सोय म्हणून दोन्हीकडची एकच मंगळागौरही अनेक घरांमध्ये एकत्रित स्वरूपात केली जाते.
मंगळागौर हे आईने मुलीला लग्नानंतर दिलेले सौभाग्य व्रत असल्याचेही मानले जाते. म्हणूनच लग्नानंतरच्या पहिल्या वर्षीच्या श्रावणात पहिल्या मंगळवारी नवविवाहितेच्या माहेरी मंगळागौर करण्याची प्रथा रूढ झाली असावी. मंगळागौर ही जरी वैयक्तिक रित्या करायची पूजा असली तरी मंगळागौर जागवायचे पारंपरिक खेळ हे सामूहिक रित्या खेळले जातात.
2019 मंगळागौर वेळापत्रक
6 ऑगस्ट 2019 - पहिला मंगळवार
13 ऑगस्ट 2019 - दुसरा मंगळवार
20 ऑगस्ट 2019- तिसरा मंगळवार
27 ऑगस्ट 2019 - चौथा मंगळवार
संस्कृती जपत मजामस्ती करण्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मंगळागौर,पूर्वीच्या काळाच्या महिलांचा हा मनोरंजन आणि फिटनेस फंडा आजही सर्वत्र प्रसिद्ध आहे. कालांतराने या सणाचे स्वरूप आणि पद्धती जरी बदलले असले तरी आजही अनेक घरांमध्ये ही संस्कृती जपली जाते,इतकंच नव्हे तर अलीकडे या घरगुती मंगळागौरीचे मोठाले ग्रुप्स बनवून मोठमोठे कार्यक्रम व स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.