वारकर्यांना आषाढी वारीची (Ashadhi Wari) विशेष उत्सुकता असते. मजल- दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने चालणारी पावलं विठ्ठल भेटीसाठी उत्सुक असतात. या वारी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) देखील समावेश असतो. मंदिर समितीकडून आषाढी यात्रेसाठी परंपरेप्रमाणे पंढरपूर (Pandharpur) येथील माऊली मठात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची बैठक संपन्न झाली आहे. त्यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदा 29 जूनला प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजनाथ यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आषाढी एकादशी यंदा 17 जुलै दिवशी आहे. त्या निमित्त पंढरपुरात मोठा सोहळा होईल. पंढरपुरात 4 दिवसांच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपल्यावर 21 जुलैला पालखी सोहळा आळंदीच्या परतीच्या प्रवासाला निघणार आहे.
माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदी मधील गांधी वाड्यातील दर्शनबारी मंडपामध्ये होणार आहे. पुण्यात 30 जून आणि 1 जुलै तर सासवड मध्ये 2, 3जुलैला मुक्काम असणार आहे. त्यानंतर अडीज दिवस मुक्काम हा लोणंद मध्ये असणार आहे. माऊलींची पालखी आषाढी एकादशी पूर्वी 16 जुलैला पंढरपूरला पोहचणार आहे. यंदा या पालखी सोहळ्याचं 339 वं वर्ष आहे. पालखी सोहळ्यामध्ये पुण्यात संगमवाडी ते भवानी पेठ तसेच निंबोरे ओढा ते फलटण विमानतळ हे अंतर पायी वाटचालीस अधिक आहे. यामध्ये सुवर्णमध्य काढून पालखी सोहळ्यामध्ये अर्ध्या तासाचा विसावा मिळावा अशी मागणी राजाभाऊ थोरात आणि नामदेव महाराज वासकर यांनी आहे.