Pratapgad Mashal Mahotsav 2020 | (File Image)

सातारा येथील किल्ले प्रतापगड मशाल महोत्सव (Pratapgad Mashal Mahotsav 2020) यंदा साधेपणाने पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील शौर्याचे स्मरण म्हणून नवरोत्रोत्सव काळात हा महोत्सव साजरा केला जात असतो. प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरास 360 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने पूर्ण प्रतापगडाच्या तटबंदीवरती मशाल पेटवून हा सोहळा साजरा करण्यात आला. कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साजरा होणार की नाही याबाबत उत्सुकता होती. मात्र, सोशल डिस्टन्सींग (Social Distancing) पाळत स्थानिकांच्या मदतीने हा महोत्सव साजरा झाला.

प्रतिवर्षी हजारो शिवभक्त किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सवाला हजेरी लावतात. गडावरील अंधार आणि दाट धुके यांमध्ये साजरा होणारा मशाल महोत्सव ही डोळ्यांना आनंदाची पर्वणी देणारी बाब असते. त्यामुळेच हा आनंद साजरा करण्यासाठी आणि हा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्य संख्येने शिवभक्त प्रतापकडावर दाखल होतात. परंतू, यंदाचे वर्ष कोरोनामुळे अपवाद ठरले. यंदा कोरोना व्हायरस संसर्गाची भीती असल्याने हे संकट टाळण्यासाठी स्थानिकांनीच हा महोत्सव साजरा केला. गडाच्या तटांवर 360 मशाली पेटविण्यात आल्या.

दरम्यान, हा महोत्सव साजरा करत असताना सरकारने घालून दिलेले नियम आणि अटींचे पालन करण्यात आले. मशाली पेटवत असताना कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही यासाठी सोशल डिस्टन्सींग पाळण्यात आले, अशी माहिती काही स्थानिकांनी दिली. (हेही वाचा, प्रतापगडावर लवकरच सुरू होणार रोप वे; आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा प्रकल्प)

भवानी मातेची विधवत पूजा, गोंधळ आदी कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ढोल ताशांचा गजर करत मशाल महोत्सव सुरु होतो. ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा घोषणा देत शिवभक्त गडांच्या तटभींती आणि परिसरात मशाल पेटूवून निघतात. या वेळी सर्व परिसर उजळून निघतो. महोत्सवानिमित्त गडावर मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाहीसुद्धा केली जाते. परंतू, यंदा या महोत्सवावर कोरोनाची छाया दाटल्याने नेहमीसारखा उत्साह पाहायला मिळाला नाही, असे शिवभक्त सांगतात.