प्रतापगडावर लवकरच सुरू होणार रोप वे; आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा प्रकल्प
Pratapgarh ( Photo Credits : commons.wikimedia)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे दाखले देताना हमखास 'प्रतापगडा'चा (Pratapgarh) उल्लेख होतो. आजही प्रतापगडाला भेट देण्यासाठी देशा-परदेशातील शिवप्रेमी येतात. पर्यटकांचा ओढा पाहता आणि महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनासाठी प्रतापगडावर लवकरच रोप वे सुरू केला जाणार आहे. पर्यटन धोरण 2016 अंतर्गत प्रतापगड रोप वे प्रकल्पाला विशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या रोप वे मार्गामुळे पर्यटकांना प्रतापगडावर पोहचणं सुकर होणार आहे.

कसा असेल प्रतापगडावरील रोप वे

प्रतापगडावर जाण्यासाठी जावळी गाव ते लॅंडविक पॉंईंट असा 5.6 किमीचा रोप वे सुरू केला जाणार आहे. त्यामुळे प्रतापगड चढून जाण्याचा वेळ कमी होणार आहे. हा रोप वे आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा एक प्रकल्प असणार आहे. सध्या प्रतापगडावर जाण्यासाठी घाटाचा रस्स्ता आहे. या रस्स्त्यामुळे पावसाळ्यात प्रचंड वाहतूक कोंडी होते. रोप वे झाल्यास पर्यटकांचा बराचसा वेळ वाचणार आहे. त्यामुळे अधिक पर्यटक आकर्षित होतील असा सरकारला विश्वास आहे.

रायगडावर पर्यटकांसाठी रोप वेचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. आता तशाचप्रकारे प्रतापगडावर रोप वे खुला केला जाणार आहे.