Margashirsha Guruvar Vrat 2023 Katha: मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी कथा काय? घ्या इथे जाणून
Margashirsh Guruvar | File Image

श्रावणाप्रमाणेच मार्गशीर्ष देखील हिंदूधर्मीयांसाठी खास महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यात प्रामुख्याने गुरूवारी महालक्ष्मी व्रत (Mahalaxmi Vrat) पाळले जाते. यंदा मार्गशीर्ष मासारंभ 13 डिसेंबर दिवशी होणार असून 11 जानेवारीला समाप्ती आहे. यामध्ये 4 मार्गशीर्ष गुरूवार पाळले जाणार आहे. महिला महालक्ष्मीच्या रूपात घट स्थापन करून तिची पूजा करतात. मग अशा मंगलमय महिन्यात दर गुरुवारी पूजेमध्ये सकाळ किंवा संध्याकाळी महालक्ष्मी व्रत कथा वाचण्याची रीत आहे. या कथेचे वाचन करून पूजा संपन्न केली जाते मग जाणून घ्या या पूजेच्या वेळेस वाचली जाणारी कथा नेमकी काय आहे?

मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रत कथा

सौराष्ट्राचा एक भद्रश्रवा नावाचा राजा होता. तो दयाळू, शुर व प्रजादक्ष होता. त्याच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं. राणी दिसायला अतिशय सुंदर मात्र प्रचंड अहंकारी होती. सुख, समृद्धी, ऐश्वर्यात राणी लोळत होती. राजाही लाड, कौतुक करत असल्याने ती अधिकच गर्वाने फुगली होती. त्या दोघांना सात पुत्र आणि एक कन्या झाली. या कन्येचे नाव शामबाला होतं. एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की मी भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जावून राहते. त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल. परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर कोणा गरिबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहील. म्हणून लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्री चे रुप धारण करुन भद्रश्रवा राजाच्या दरबारी येते. वृद्ध स्त्री चे रुप धारण करुनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली. त्यावर वृद्ध स्त्रीच्या रुपातील लक्ष्मी देवीने सांगितले की, तुझी राणी मागच्या जम्नात ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे. एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरुन ती रागाने घराबाहेर पडली. रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या. ते लक्ष्मीचं व्रत होतं. ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली. व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली. तिचं दारिद्रय नष्ट झालं.

लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रश्रवा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली. मात्र देवीला विसरली. म्हणून त्याचीच आठवण करुन द्यायला मी इथे आले आहे. तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध स्त्री रुपी लक्ष्मी देवी दासीला ऐकवते. त्यानंतर दासी महलात जावून राणीसाहेबांना वृद्ध स्त्रीने सांगितलेली महती ऐकवते. मात्र राजवैभवात लोळणाऱ्या तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्री रुपी लक्ष्मी देवीचा अपमान करते. झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मी देवी तिथे थांबत नाही. बाहेर पडत असताना तिला राजकुमारी शामबाला भेटते. शामबालाला वृद्ध स्त्री घडलेला प्रकार सांगते. त्यावर शामबाला वृद्ध स्त्रीची माफी मागते. देवीला तिची दया येते आणि ती मार्गशीष महिन्यातील गुरुवारचे महत्त्वही पटवून देते. तो दिवस मार्गशीष महिन्यातील पहिला गुरुवार असतो. शामबाला मनापासून गुरुवारचे व्रत करते. देवीच्या कृपेने तिचा विवाह सिध्देश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सारं काही प्राप्त होतं. पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते.

मात्र सुरतचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रश्रवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. आलेलं दारिद्रय पाहून राणी राजाला विनंती करते की, आपला जावई खूप धनवान आहे. आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो. पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो. चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्याची विनम्रतेने चौकशी करतात. तेव्हा तो राणी शामबालाचा वडिल असल्याचे समजते. ही खबर दासी राणीपर्यंत पोहचवतात. तेव्हा राज पोशाख पाठवून अगदी थाटामाटात शामबाला वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वान्नांचं भोजन होतं. परतताना जावई सुवर्णमुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो. राजा परतल्यावर सुरतचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात.

नशीबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सुरतचंद्रीका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस मार्गशीष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो. त्या दिवशी शामबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते. तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करु लागते. त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर्य प्राप्त होते. राजा आणि ती आनंदाने जगू लागतात.

काही दिवसांनंतर शामबाला आपल्या माहेरी येते. तेव्हा राणीला कोळशांनी भरलेला हंडा आठवतो. त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरातिथ्यं ती करत नाही. याउलट अपमान करते. सासरी परताना तिला काहीच देत नाही. मात्र याचं कोणतंही दुःख करुन न घेता मूठभर मीठ घेऊन ती सासरी परतते.

सासरी आल्यानंतर पती मालाधर तिला विचारतो, माहेरुन काय आणणलंस? त्यावर ती उत्तरते मी तिथेलं सार आणले आहे. याचा अर्थ काय? या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जेवणातील अळणी पदार्थ चाखतो. त्यानंतर शामबाला पानात थोडसं मीठ वाढतो. त्या मीठाने साऱ्या अन्नाला चव येते.

तेव्हा शामबाला म्हणते, हेचा आहे माहेरुन आणलेले सार. मीठ जीवनाचे अमृत आहे ! अन्नाला चव येते ती मिठानंच ! मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं, त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. शामबालेच्या बोलण्यातील खोच पती जाणतो.

त्यानंतर मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपले सेवक सासर्‍याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतले. भद्रश्रवा जावयाकडे येतो. दोघांची गुप्त बैठक होते. मग ते भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रूसैनिक जमिनीवर कोसळत होते. अपूर्व विजय होतो आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळतं. त्यानंतर सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळते. या व्रतामुळे राजा-राणी सुखी झाले. नक्की वाचा: Margashirsha Mahalakshmi Vrat : जाणून घ्या कसे करावे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत, पूजेची मांडणी आणि विधी .

मार्गशीर्ष महिन्यात अनेकजण घरी मांसाहार टाळतात. दर गुरूवारी महालक्ष्मी मातेची पूजा करतात. शेवटच्या गुरूवारी सवाष्ण महिला, मुलींना घरी बोलावून तिचं पूजन करण्याची तिला वाण आणि हळदी कुंकू देण्याची रीत आहे.