Margashirsha Guruvar Vrat 2023 Dates: 13 December पासून यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात; पहा महालक्ष्मी व्रताच्या तारखा!
Margashirsh Guruvar | File Image

हिंदूधर्मीयांसाठी मार्गशीर्ष हा एक पवित्र महिना असतो. मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्यात महालक्ष्मीचं व्रत घराघरामध्ये पाळण्याची रीत आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरूवारी हे व्रत ठेवलं जातं. या निमित्ताने अनेक घरात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्षातही मांसाहार व्यर्ज असतो. मग यंदा हा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आणि कधी पर्यंत असणार आहे? याची माहिती जाणून घ्या. मार्गशीर्ष महिन्यात महिन्यांत यंदा कोणत्या दिवशी गुरूवारचं महालक्ष्मीचं व्रत पाळलं जाणार आहे याची देखील माहिती नक्की जाणून घ्या म्हणजे तुम्हांला त्या निमित्ताने घटाची सजावट आणि पूजेच्या अनुषंगाने अन्य तयारी करणं सोप्पं होणार आहे.

यंदा मार्गशीर्ष महिना कधी होणार सुरू? 

महाराष्ट्रात यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 13 डिसेंबर पासून होणार आहे. तर पहिला गुरूवार 14 डिसेंबर दिवशी आहे. मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 12 डिसेंबरच्या रात्री 6.24 वाजता अमावस्या संपल्यानंतर होणार आहे. मार्गशीर्ष मासारंभ  13 डिसेंबरला असून या महिन्याची सांगता 11 जानेवारी दिवशी संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा महालक्ष्मी व्रतासाठी 4 गुरूवार पाळले जाणार आहेत.   हे देखील वाचा: Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा विधी, नियम व वैभवलक्ष्मी घट मांडणी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती .

मार्गशीर्ष गुरूवार 2023 व्रत तारखा

पहिला गुरूवार - 14 डिसेंबर

दुसरा गुरूवार - 21 डिसेंबर

तिसरा गुरूवार - 28 डिसेंबर

चौथा गुरूवार - 4 जानेवारी

मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रत 

मार्गशीर्ष महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मीचं प्रतिकात्मक रूप म्हणून घट बसवण्याची रीत आहे. घटाला महालक्ष्मीच्या वेशात सजवलं जातं. हार-वेणी अर्पण करून दर गुरूवारी पूजा केली जाते. सकाळ-संध्याकाळ घटाची पूजा करून दिवसभराचा उपवास महिला ठेवतात. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरूवारी उद्यापन करताना महिलांसाठी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या निमित्ताने सवाष्ण महिलांना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू आणि वाणात एखादी भेटवस्तू दिली जाते.

टीप- सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला असून त्याची पुष्टी लेटेस्टली मराठी करत नाही.