Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा विधी, नियम व वैभवलक्ष्मी घट मांडणी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Margashirsha Guruvar Vrat Puja Vidhi (Photo Credits: Youtube)

Margashirsha Mahalakshmi Guruvar Vrat: मराठी वर्षामधील नववा महिना मार्गशीर्ष (Margashirsha), यंदा 27 नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत (Mahalakshmi Vrat) करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, अशी प्रार्थना केली जाते. तिथीनुसार यंदा 28 नोव्हेंबर रोजी पहिला तर 19 डिसेंबर रोजी शेवटचा गुरुवार असणार आहे. या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. सुद्धा शेजारपाजारच्या सवाष्ण स्त्रिया हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करत वैभव लक्ष्मी व्रतकथेचे पठण करतात. चला तर मग यंदाच्या मार्गशीर्ष मासारंभ आधी जाणून घेउयात वैभलक्ष्मी व्रताची पूजा विधी, नियम व घट मांडणी कशी करावी..

मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा विधी व घट मांडणी

घरातील पूजेची जागा स्वच्छ करून त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा. चौरंगावर नवीन कापड अंथरावे. कापडावर गहू वा तांदूळ यांची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा.  पाटावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो ठेवावा किंवा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर वा पाटावर ठेवावी. मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा.

घट मांडल्यावर सर्व कुटुंबासमवेत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी. त्यानंतर आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला गोडाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर भोजन करावे. यादिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. दुध आणि फळांचे सेवन करावे, या दिवसात घरात मांसाहार करू नये. दुसऱ्या दिवशी या कलशातील विडा, फुले आणि विड्याची पाने विसर्जित करावी. तर कलशातील पाणी तुळशीला घालावे. दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पुजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी सवाष्णींना हळदीकुंकू, फळे देऊन इतर वाण लुटले जाते.

मार्गशीर्ष गुरुवार व्रत नियम

- ही पूजा शक्य तितक्या प्रातःकाळी करावी.

-दिवसभर उपवास करून त्यानंतर सायंकाळी महालक्ष्मीला नैवैद्य दाखवून मगच उपवास सोडावा

-या व्रतात खंड पाडू नये, काही आकस्मिक अडचण आल्यास कुटुंबातील अन्य सदस्याने उपवास व     पूजा करावी.

-महालक्ष्मी व्रताची कथा आवर्जून वाचावी. (Margashirsha Guruvar Vrat Katha: मार्गशीर्ष गुरूवार व्रत कथेत दडलंय महालक्ष्मीच्या पूजेचे महत्त्व; वाचा सविस्तर)

-सात कुमारिकांना वा सवाष्ण स्त्रियांना हळदी- कुंकू, फळं, द्यावीत तसेच व्रताच्या पहिल्या वर्षी लक्ष्मी व्रत काठाची पुस्तके वाटावीत.

असं म्हणतात, जो कोणी या व्रताचे पालन करतो त्याच्या संसारात महालक्ष्मीचा वरदहस्त टिकून परिणामी धनधान्य, समृद्धी याची वृद्धी होत राहते.

(टीप- या लेखाचा उद्देश माहिती देणे हा आहे, यातून लेटेस्टली मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही)