bornhan | Insta

ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार नववर्षाची सुरूवात जानेवारी महिन्यापासून होते. या नव्या वर्षामध्ये येणारा पहिला वहिला सण म्हणजे मकर संक्रांत (Makar Sankranti). 2024 हे लीप ईयर असल्याने या वर्षात मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीला महिला काळे कपडे घालून एकमेकींना या सणाच्या शुभेच्छा देतात. हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करतात. संक्रांत हा सण जसा स्त्री वर्गासाठी, नव दांपत्यांसाठी खास असतो तसा तो लहान मुलांसाठी देखील खास आहे. मकर संक्रांतीला अनेक घरात लहान मुलांचे 'बोरन्हाण' (Bornahan) देखील केले जाते. बोरन्हाण हे देखील महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाप्रमाणे संक्रांत ते रथ सप्तमी अशा काळात केव्हाही केले जाऊ शकते.

भारतीय संस्कृती मध्ये सण-वारांसोबत बदलत्या ऋतूचक्राचे आपल्या आरोग्यावर चूकीचे परिणाम होऊ नयेत म्हणूनही काळजी घेतली जाते.बोरन्हाण मागे देखील हाच प्रमुख विचार आहे. शिशूसंस्कार म्हणून बोरन्हाण  केले जाते. जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरन्हान केले जाते. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेली फळं जशी बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरुन टाकल्या जातात.

कसे करतात बोरन्हाण?

लहान मुलांना बोरन्हाण च्या दिवशी शक्य असल्यास छान काळ्या रंगाचे कपडे घालतात. त्यांना देखिल हलव्याच्या दागिन्यांनी सजवतात. बाळाच्या बोरन्हाला ओळखीच्या, नात्यातील, मित्रमंडळीतील अन्य लहान मुलांना आमंत्रित केले जाते. घरात जमिनीवर स्वच्छ कपडा अंथरून त्यावर एक पाट ठेवून तुमच्या बाळाला त्या पाटावर बसवा. त्यानंतर आप्तेष्टांकडून लहान मुलाला ओवाळून घ्या. बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करुन ज्याचे बोरन्हाण करत आहोत त्याच्या डोक्यावरुन हळूहळू खाली सोडा. त्यानंतर आमंत्रित केलेल्या लहान मुलांना ती बोरं, उसाची पेरं, तिळाची बोरे उचलून घ्यायला सांगा. बोरन्हाण मध्ये वापरण्यात येणारी फळे मुले इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरन्हाणच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जातात.

यंदा 15 जानेवारीपासून (मकर संक्रांत)  16 फेब्रुवारी (रथ  सप्तमी) पर्यंत बोरन्हाणचा कार्यक्रम केला जाऊ शकतो.  यासाठी विशेष दिवस, मुहूर्ताची गरज नसते. तुमच्या सोयीने दिवस, वेळ ठरवला जाऊ शकतो. बोरन्हाण शक्यतो हळदी कुंकवाप्रमाणे संध्याकाळी केले जाते.