
हिंदू संस्कृतीमध्ये भगवान महादेवाशी निगडीत साजरा होणारा उत्सव किंवा सण म्हणजे महाशिवरात्री (Mahashivratri 2021). आज म्हणजेच माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा होतो. महाशिवरात्र या दिवशी शिवतत्त्व नेहमीपेक्षा कैक पटीने कार्यरत असते, तसेच या दिवशी भगवान शिव विश्रांती घेत असतात असा समज आहे. महाशिवरात्रीचा दिवस शिवाची आराधना करून, पूजा अर्चना करून, उपवास धरून मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
या दिवशी एक वेळ भोजन करून रहावे, चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प करावा आणि नंतर स्नान, शिवपूजा इ. द्वारे व्रत पूर्ण करावे, असे सांगितले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करावी असे शास्त्रात सांगितले आहे. तसेच प्रदोष काळातील पूजा शुभ मानली आहे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात. तर अशा या पवित्र दिनी खास मराठी HD Images, Greetings, Wishes, Messages, Facebook आणि Whatsapp Status शेअर करून शुभेच्छा देऊ शकता.






दरम्यान, ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी त्यातून हलाहल विष देखील बाहेर आले. त्यावेळी शिवाने हा विष प्राशन करून ब्रम्हांडाचे रक्षण केले. मात्र विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपुर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय सांगितला. त्यावेळी सर्व देवांनी महादेवाला बरे वाटावे म्हणुन रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. यामुळेच सृष्टी वाचली म्हणुन या दिवसाला महाशिवरात्री असे म्हंटले जाते. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते असा समज आहे.