Kisan Diwas 2019 : राष्ट्रीय शेतकरी दिन नेमका का साजरा केला जातो? जाणून घ्या
Kisan Diwas 2019 (PC - File Photo)

Kisan Diwas 2019: भारत हा शेतीप्रधान देश आहे. तसेच 'शेती' हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांचा वाढदिवस (23 डिसेंबर) 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंह यांनी भरीव कामगिरी केली आहे. चरण सिंग यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना केली. अटल बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत 2020 मध्ये महासत्ता होणार असल्याचा आशावाद व्यक्त होतो. मात्र, दुसरीकडे देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. देशात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होतो. परंतु, याच देशात सध्या शेतकरी सुविधांपासून वंचित आहे. तसेच अलिकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येतही वाढ होत आहे. (हेही वाचा - Kisan Diwas 2019 Wishes: किसान दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Messages, HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करा आंनद; शेतकरी बांधवांना देऊ शकाल कामाची पोचपावती)

शेतकऱ्याला सन्मानाने 'बळीराजा' म्हटले जाते. परंतु, प्रत्यक्षात हा राजा अतिशय दीनदुबळा झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे. कर्जबाजारीपणा, वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि आर्थिक विवंचना या आपत्तींचा बळी शेतकरी ठरलेला आहे. प्रत्येक भारतीयाने समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे गरजेचे आहे. (हेही वाचा - National Mathematics Day: भारतातील 'हे' 5 महान गणित तज्ञ तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या)

सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. नैसर्गिक आपत्ती असेल किंवा राजकीय निष्क्रियता यामुळे देशभरात शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. 2 महिन्यांपूर्वी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या हा पर्याय निवडला. परंतु, आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही हे शेतकऱ्यांनी समजून घ्यायला हवं. यासाठी सरकारनेदेखील प्रयत्न करणं आवश्यक आहे. सरकारने शेतीमालाला योग्य हमीभाव देणं, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जीवन जगणं सोप होईल आणि स्वत: चा विकास करण्यास चालना मिळेल. आज राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना शेतकरी दिवसाच्या शुभेच्छा नक्की द्या. जेणे करून त्यांनाही शेतकरी असण्याचा अभिमान वाटेल.