यंदाच्या स्वातंत्र्य दिनासोबत (Independence Day 2022) भारताला आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षीचा स्वातंत्र्यदिन आम्हा भारतीयांसाठी अनेक अर्थांनी खास आहे. या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मार्च 2022 रोजी साबरमती येथील गांधीजींच्या आश्रमातून ‘आझादी का अमृत महोत्सव’ नावाचा कार्यक्रम सुरू केला होता. 12 मार्च हा तो दिवस होता जेव्हा महात्मा गांधींनी 1930 मध्ये आपली दांडीयात्रा सुरू केली होती. यासोबतच भारत सरकारने लोकांच्या हृदयात ऊर्जा आणि एकतेची भावना निर्माण करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहीमही सुरू केली आहे.
यासाठी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्व देशवासियांना त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये यासाठी लोकांना तिरंग्याचे वाटपही केले जात आहे. या दरम्यान स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी बलिदान दिलेल्या शूर शहीदांचे स्मरण केले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होऊ शकले नाहीत, परंतु यंदा सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
15 ऑगस्टच्या या खास प्रसंगी, आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत खास WhatsApp Status, Wishes, Messages, Quotes च्या माध्यमातून शेअर करा महापुरुषांचे क्रांतिकारी विचार.
दरम्यान, अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 च्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान सभेला वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त झाले होते. ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्षांहून अधिक काळ राज्य केले. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले 'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत, तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले 'वन्दे मातरम्' हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले. (हेही वाचा: 15 ऑगस्ट निमित्त मुलांसाठी 'असे' तयार करा भाषण; प्रेक्षक करतील टाळ्यांचा वर्षाव)
संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे भारताची राष्ट्रीय सुट्टी असते.