Makar Sankranti 2020 Bornahan: लहान मुलांचे का केले जाते बोरन्हाण? कशी कराल तयारी; वाचा सविस्तर
Bornahan (Photo Credits: File)

Makar sankranti 2020 Bornan: मकर संक्रांत हा प्रामुख्याने महिला वर्गासाठी महत्त्वाचा सण असतो किंबहुना हा महिलांसाठीच सण असतो असं म्हणतात. हे खरे असले तरीही हा सण महिला इतकाच लहान चिमुकल्यांसाठी ही खास असतो. कारण मकर संक्रांतीच्या दिवसांत लहान मुलांचे 'बोरन्हाण' (Bornahan) केले जाते. आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की बोरन्हाण म्हणजे काय? तर जसं नवविवाहित मुलीला हलव्याचे दागिने घातले जाते तसेच लहान मुलांना देखील हलव्याचे दागिने घातले जातात. छान सजवले जाते. महिलांमध्ये हळदीकुंकूवाचा जसा समारंभ असतो तसा लहान मुलांचा बोरन्हाण देखील समारंभ असतो. संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंतच्या काळात तुम्ही कधीही लहान मुलांचे बोरन्हाण घालू शकता.

बोरन्हाण हे लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी करण्यात येणारी पारंपारिक पद्धत आहे. मूल जन्माला आल्यानंतर येणा-या पहिल्या संक्रांतील लहान मुलांना हे बोरन्हाण घातलं जाते. शिशूसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घालतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे उदारणार्थ बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरुन टाकल्या जातात.

हेदेखील वाचा- Makar Sankranti 2020 Mehndi Designs: मकर संक्रांत निमित्त 'या' खास मेहंदी डिझाईन्स काढून वाढवा आपल्या हाताचे सौंदर्य!

कसे करावे हे बोरन्हाण?

लहान मुलांना छान काळ्या रंगाचे कपडे घालून त्यांना हलव्याचे दागिने घाला. अन्य लहान मुलांना तसेच जवळच्या नातेवाईकांना या कार्यक्रमासाठी बोलवा. घरात जमिनीवर स्वच्छ कपडा अंथरून त्यावर एक पाट ठेवा. तुमच्या बाळाला त्या पाटावर बसवा. त्यानंतर आप्तेष्टांकडून लहान मुलाला ओवाळावे. लहान मुलांचा कार्यक्रम असल्यामुळे लहान मुलांना बोलावणे तर आलेत. बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करुन ज्याचे बोरन्हाण करत आहोत त्याच्या डोक्यावरुन ओतावे. त्यानंतर तेथे आलेल्या लहान मुलांनी ते बोरे, गोड- गोड उसाचे पेर, तिळाची बोरे उचलून खावीत किंवा घरी घेऊन जावी. बोरन्हाण मध्ये वापरण्यात येणारी फळे मुले इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरन्हाणच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जातात.

मात्र सध्या या बोरन्हाणच्या ट्रेंड थोडा बदलला असून यात काही जण चॉकलेट्सही टाकतात. ट्रेंड काहीही होवो मात्र लहान मुलांचे बोरन्हाण करण्याची परंपरा मोडू नये म्हणजे झाले. जर तुमच्या लहान मुलाचे बोरन्हाण करणे राहून गेले असेल तर मजा म्हणूनही करायला काहीच हरकत नाही. नाही का?