Friendship Day 2019: मराठी कलाकारांच्या मैत्रीची ही 5 'त्रिकुटं' आहेत ऑल टाइम हिट (See Photos)
Friendship Day (Photo Credits: File Photo)

टीव्ही सिनेमा मध्ये काम करणाऱ्या कलाकारांविषयी अनेक कानगोष्टी सातत्याने समोर येत असतात. त्यातही सेलिब्रिटी फाईट्सच्या खबरी तर वाऱ्यासारख्या पसरतात. अगदी थोडक्यात सांगायचं तर अलीकडे, एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला काम सोडून डोळ्यासमोरही उभं करत नाही अशी एक सर्वसाधारण समजूत तयार झाली आहे. पण अशा सर्व गैरसमजुतींना मोडून काढत मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मित्रांच्या या पाच त्रिकुटांनी मागील काही वर्षात मैत्रीची नवी व्याख्या तयार केली आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी म्हणजे 4 ऑगस्ट 2019 ला फ्रेंडशिप डे (Friendship Day) साजरा होणार आहे. चला तर मग याच निमित्ताने या त्रिकुटांच्या दोस्तीवर एक नजर टाकूयात...

 'द भडिपा गॅंग'

भडिपा म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टी ही हटके सीरिज अगदी अल्पावधीतच बरीच हिट झाली. यासोबतच भडिपा मधील निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ आणि सारंग साठ्ये या मित्रांच्या तिकडीने सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. निपुण-अमेय आणि सारंग हे एकाच कॉलेजमध्ये असल्याने तिथेच त्यांची ओळख झाली. योगायोगाने त्यांना कलाक्षेत्रात काम करायचं असल्याने गुण जुळून मैत्रीही झाली. अमेय दिल दोस्ती दुनियादारी या झी मराठीच्या मालिकेतून अगोदरच घराघरात पोहचला होता, तर संगीत नाटक, सिनेमा यामधून निपुणचे काम सुरू होते.यावेळेस सारंगच्या सुपीक डोक्यातून भडिपाची भन्नाट कल्पना आली आणि मग सगळी जमवाजमव करून हा डोलारा उभा झाला. अलीकडे सेलेब्रिटी लग्नाचा ट्रेंड सुरू असल्याने या प्रसंगी हे त्रिकुट अगदी हमखास पाहायला मिळते. तुम्हालाही यांच्या हटके केमिस्ट्रीचा नमुना पाहायचा असल्यास भडिपाचा कास्टिंग काऊच एपिसोड नक्की पाहा..

सिनेमाची हिट मशीन

मराठी सिनेमामध्ये मैत्री हा विषय अनेकदा मांडला गेला पण उदाहरण द्यायचे झाल्यास नेहमीच दुनियादारी या सिनेमाचे नाव ओठांवर येते. यामधील ऑन स्क्रीन मित्रांच्या जोडयांसोबत दिग्दर्शक संजय जाधव, व कलाकार स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांचं कॉम्बिनेशन सुद्धा हिट ठरलं. या त्रिकुटाने आजवर प्यार वाली लव्ह स्टोरी, तू ही रे यांसारखे अनेक हिट सिनेमे देत आपली केमिस्ट्री दाखवून दिली.

नाटक-सिनेमा आणि बरंच काही

मराठी इंडस्ट्री मधील आणखीन एक दिग्दर्शक कलाकार मैत्रीचं त्रिकुट म्हणजे केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी. या तिघांनी आजवर नाटक आणि सिनेमा या दोन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून एकत्र काम करत असताना त्यांची मैत्री झाली आणि मग कामाच्या निमित्ताने हे नातं आणखीनच घट्ट होत गेलं. ह्यांचा काही नेम नाही, माझा नवरा तुझी बायको आणि आता अलीकडेच कल्ला या सिनेमातून त्यांना एकत्र पाहायला मिळालं होतं. साधारणतः आता सिनेसृष्टीत त्यांचा फारसा सक्रिय सहभाग नसला तरीही त्यांची मैत्री ही नेहमीच कौतुकाचा विषय ठरते.

जिवाभावाच्या मैत्रणी

तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे आणि अभिज्ञा भावे या तिन्ही अभिनेत्री इतर जोड्यांप्रमाणे व स्क्रीन फार एकत्र दिसल्या नाहीत पण या ना त्या कारणाने त्यांची मैत्री मात्र सतत चर्चेत राहिली. तेजस्विनी आणि अभिज्ञा यांनी पुढे एकत्रपणे तेजाज्ञा हा ऑनलाइन साड्यांचा व्यवसाय सुद्धा सुरू केला. या दोघींपैकी कोणीही चला हवा येऊ द्या मध्ये आल्यावर त्यांची नकल करणाऱ्या श्रेया कडे पहिल्यावर तिच्या अभिनयसोबतच त्यांच्या मैत्रीचा सुद्धा प्रत्यय येतो. याचे आणखीन एक उदाहरण म्हणजे तेजस्विनीच्या वडिलांच्या मृत्यू ज्या तारखेला झाला तीच श्रेयाची जन्मतारीख आहे. यंदा या दिवशी तेजस्विनीने आपल्या वडिलांच्या जाण्याचं दुःख बाजूला सारत आपल्या मैत्रणीच्या आनंदासाठी एक खास पोस्ट लिहिली होती.

बिग बॉस मधील यारी

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्व जितकं गाजलं तितकीच गाजली ती सई लोकूर, मेघा धाडे आणि पुष्कर जोग यांची दोस्ती. घरात सकाळच्या डान्सपासून ते रात्री झोपेपर्यंत हे तिघे एकमेकांना सावरत सांभाळत खेळत होते. अगदी पाहिल्या टास्कपासून दिसलेली त्यांची ही केमिस्ट्री शेवटच्या दिवसापर्यंत आणि बिग बॉस संपल्यावर बाहेरही टिकून राहिली. साहजिकच खेळ म्हंटल्यावर कधी त्यांच्यात हेवेदावे सुद्धा झाले पण मनात काही न ठेवता आजही ते घराबाहेर खूप चांगले मित्र आहेत.

असं म्हणतात की दोन मित्र एकत्र आल्यावर गप्पा होतात आणि तीन मित्र जमल्यावर तिसऱ्याची मस्करी. आता अर्थात या त्रिकूटमध्येही ही थट्टामस्करी होत असणार हे नक्की पेज त्यापलीकडे त्यांनी जपून ठेवलेलं हे मैत्रीचं नातं खरोखरच वाखाणण्याजोगं आहे.