धनत्रयोदशी 2018

दिवाळीच्या सेलिब्रेशनची सुरूवात ही धनत्रयोदशी (धनतेरस) पासून होते. असं म्हटलं जातं की सुखी घरातलं पहिलं सिक्रेट म्हणजे चांगलं आरोग्य आणि दुसरं सिक्रेट म्हणजे पुरेसा पैसा. धनत्रयोदशी हा दिवाळीतला असा एक सण आहे ज्यादिवशी घरात चांगलं आरोग्य आणि त्याच्या बरोबरीने पैशांची बरसात होत रहावी याकरिता प्रार्थना केली जाते.

यंदा धनत्रयोदशी ही 5 नोव्हेंबर 2018, सोमवारी आहे. या दिवशी घरात कुबेराची पूजा करून पुढील वर्षभर घरात आर्थिक चणचण भासू नये यासाठी प्रार्थना केली जाते तर धन्वंतरीची पूजा करून आरोग्याच्या देवतेकडे उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. तसेच संध्याकाळी यमदीपदान केले जाते. यामुळे अकाली मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी प्रार्थना केली जाते.

उत्तम आरोग्य आणि सुख शांतीसाठी प्रार्थना

धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, इंद्राने असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले. या समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीची या दिवशी पूजा केली जाते. या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. आयुर्वेदामध्ये धन्वंतरीची पूजा केली जाते त्यामुळे भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा करायला सुरूवात झाली आहे.

धनत्रयोदशी दिवशी काय कराल ?

धनत्रयोदशी दिवशी सायंकाळी यमदीपदान करण्याची प्रथा आहे. सामान्यपणे सूर्यास्तानंतर दीपदान केले जाते. Diwali 2018 : दीर्घायुष्यासाठी धनतेरसच्या दिवशी यमदीपदान का केले जाते ?धनत्रयोदशीदिवशी कुबेराच्या मूर्तीचीदेखील पुजा केली जाते. तसेच या दिवशी सोनं, चांदी खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच धनत्रयोदशी दिवशी एखादे भांडं विकत घेतल्याने घरात शांती, सुख, समृद्धी राहते असे म्हटले जाते. Diwali 2018 : धनतेरसच्या दिवशी 'या' 4 वस्तूंची खरेदी कराल तर घरात पसरेल सुख, समुद्धी आणि पैसा !

धनत्रयोदशी पूजेचे शुभ मुहूर्त -

शुभ मुहूर्त – संध्याकाळी 6.05 ते रात्री 8.01 पर्यंत

प्रदोष काल - संध्याकाळी 5.29 ते रात्री 07.00 पर्यंत

वृषभ काल - संध्याकाळी 6.05 ते रात्री 8.01 पर्यंत

आजच्या दिवशी घरात सुख, समृद्धी, पैसा नांदत रहावा याकरिता प्रार्थना केली जाते, सोन्याची वस्तू विकत घेतली जाते. मग पहा यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदीची वस्तू विकत घेण्याची शुभ वेळ कोणती? आज केवळ धनासाठी नव्हे तर चांगल्या आरोग्यासाठी धन्वंतरीचीही पूजा करा.