अंगारकी संकष्टी (Photo Credits: File Photo)

Angaraki Sankashti Chaturthi 2018: हिंदू कॅलेंडरनुसार एका महिन्यात दोन चतुर्थी येतात. पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. जर ही चतुर्थी मंगळवारी आली तर त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी (Angaraki Sankashti Chaturthi) असं म्हटलं जातं. गणेश भक्तांसाठी संकष्टी चतुर्थी आणि अंगारक संकष्टी चतुर्थी दोन्हीचं विशेष महत्त्व असतं. या दिवशी गणेशाची पूजा करून दिवसभर उपवास ठेवला जातो. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर मोदकाचा नैवैद्य दाखवून उपवास सोडला जातो. यंदा 2018  वर्षांमध्ये 3 अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्या होत्या. त्यापैकी शेवटची अंगारकी आज म्हणजे 25  डिसेंबर 2018 दिवशी आहे.

अंगारकी संकष्टी मुहूर्त

दाते पंचांगांनी दिलेल्या माहितीनुसार आज चंद्रोदय रात्रौ 9 वाजून 1 मिनिटांचा आहे. त्यामुळे दिवसभराचा उपवास रात्री सोडण्यात येईल.

अंगारकी संकष्टी दिवशी काय कराल ?

अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचं पुण्य मिळतं असा समाज आहे. गणपतीची आराधना करून संकट दूर ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. घराच्या घरी गणपतीची पूजा करताना आजच्या दिवशी जेवणात कांदा -लसूण विरहित जेवण बनवले जाते. तसेच गोडाच्या पदार्थामध्ये उकडीचे मोदक नैवैद्य म्हणून ठेवले जातात. मोदक गणपतीच्या आवडीचे असल्याने अंगारकी संकष्टी दिवशी हमखास मोदक बनवले जातात. उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यदायी फायदे !

मग आज ख्रिसमस सोबतच अंगारकी संकष्टी चतुर्थीचा देखील दिवस असल्याने हा मंगलमय दिवस तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घेऊन येवो !