Amarnath's Shiva Lingam (Photo Credits: ANI)

दक्षिण काश्मीरमधील हिमालयात असलेल्या अमरनाथजी श्राईन बोर्डाने (Shri Amarnathji Shrine Board) शनिवारी अमरनाथ यात्रा 2021 (Amarnathji Yatra 2021) चा विस्तृत कार्यक्रम शनिवारी जाहीर केला. या कार्यक्रमानुसार, लोक 1 एप्रिलपासून ट्रॅव्हल परमिटसाठी अर्ज करू शकतील. ट्रॅव्हल परमिट देण्याची जबाबदारी तीन बँकांना देण्यात आली आहे. हे गुहेतील मंदिर 3880 मीटर उंचीवर आहे. यासाठी 56 दिवसांचा प्रवास पहलगाम आणि बालटाल मार्गावरून 28 जून रोजी सुरू होईल आणि 22 ऑगस्टला संपेल. या महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व कोविड-19 प्रोटोकॉल लागू आहेत आणि सरकारने जारी केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतींचे पालन केले जाईल.

मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वर कुमार म्हणाले की, श्री अमरनाथ यात्रा 2021 चे इच्छुक भक्त पंजाब नॅशनल बँकेच्या 316 शाखा, जम्मू-काश्मीर बँकेच्या 90 शाखा आणि येस बँकेच्या 40 शाखांकडून परवान्यासाठी अर्ज घेऊ शकतात. मंडळाच्या www.shriamarnathjishrine.com या संकेतस्थळावर यात्रेविषयी सर्व माहिती अपलोड करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. भाविक तेथूनही हा तपशील वाचू शकतात. राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासकांचे अधिकृत डॉक्टर किंवा वैद्यकीय संस्थांनी दिलेली आरोग्य प्रमाणपत्रेच नोंदणीकृत बँक शाखांमध्ये स्वीकारली जातील. प्रमाणपत्रे अनिवार्य आहेत कारण गुहा अतिशय उच्च उंचीवर आहे आणि प्रवास कठीण आहे.

कुमार म्हणाले की, 13 वर्षाखालील किंवा 75 वर्षांपेक्षा जास्त व सहा आठवड्यांहून अधिक गरोदर स्त्रिया अशा लोकांची कोविड-19 मापदंडांनुसा या वर्षीच्या यात्रेसाठी नोंदणी होणार नाही. यात्रेसाठी आठवड्याच्या प्रत्येक दिवसासाठी आणि प्रवासाच्या भिन्न मार्गासाठी परमिट वेगवेगळे असेल. हेलिकॉप्टरने प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्या यात्रेकरूंना आगाऊ नोंदणीची आवश्यकता भासणार नाही, कारण त्यांचे तिकीट यासाठी पुरेसे असेल. (हेही वाचा: Good Friday and Easter Sunday 2021: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा उद्रेक; गुड फ्रायडे तसेच ईस्टर सन्डे साधेपणाने साजरा करण्याचे राज्य सरकारचे आवाहन)

बाबा अमरनाथ यात्रा दरम्यान बहुतांश लंगर यात्रेचे बेस कॅम्प बालटालमध्ये लागणार आहेत. प्रवासाचे दोन मार्ग आहेत ज्यात बालटाल आणि चंदनवाडीचा समावेश आहे. या प्रवासादरम्यान एकूण 116 लंगर घालण्यात येणार आहेत.