Crown | Representational image (Photo Credits: pxhere)

मिस युनिव्हर्स इंडोनेशिया (Miss Universe Indonesia) स्पर्धेतील सहा स्पर्धकांनी आयोजकांवर लैंगिक छळाचा (Sexual Harassment) आरोप केला आहे. स्पर्धकांनी आपल्या आरोपांमध्ये म्हटले आहे की, त्यांना टॉपलेस करुन त्यांची 'शारीरिक तपासणी' करण्यात आली आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, स्पर्धकांनी केलेल्या तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल असेही इंडोनेशिया पोलिसांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जकार्ता येथे 29 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत इंडोनेशिया मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील सहभागींनी सांगितले की, आयोजकांनी त्यांच्यापैकी पाच जणींना एका खोलीत बोलावले. जिथे 20 पेक्षा अधिक पुरुष होते. त्यांना या सर्वांसमोर शारीरिक तपासणीच्या नावाखाली केवळ अंतरवर्स्त्रे घालून उभे राहण्यास सांगितले. (हेही वाचा, Miss World 2023: यंदा भारतामध्ये होणार मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेचे आयोजन; तब्बल 27 वर्षानंतर देशाला मिळाले विश्वसुंदरी स्पर्धेचे यजमानपद)

स्पर्धकांच्या वकीलाने मेलिसा अँग्रेनी यांनी म्हटले की, खोलीमध्ये स्पर्धकांचे टॉपलेस फोटो काढण्यात आले. खरेतर अशा प्रकारच्या तपासणीची कोणतीही गरज नव्हती. तरीही आयोजकांनी अशा प्रकारची तपासणी का केली? असा सवाल उपस्थित करत सहा स्पर्धकांनी तक्रार केली आहे.

मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेतील एका स्पर्धकाने (महिला) पत्रकार परिषदेत सांगितले की, आयोजकांनी पाय उघडे करुन आणि विचीत्र पद्धतीने विलग करुन अनुचीत पोझ देण्यास सांगितली. वृत्तवाहिन्यांनी या स्पर्धकाची प्रतिक्रिया प्रसिद्ध केली मात्र, तिचा चेहरा अस्पष्ट करण्यात आला होता. आपणास अशा प्रकारच्या तपासणीमुळे अत्यंत लज्जास्पद वाटले, अशी भावनाही या मॉडेलने व्यक्त केली.

वृत्तसंस्था रॉयटर्सने मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धा चालवणार्‍या कंपनी, पीटी कॅपेला स्वस्तिका कार्या आणि कंपनीचे संस्थापक, पॉपी कॅपेला यांच्याशी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

दरम्यान, नोव्हेंबरमध्ये एल साल्वाडोर येथे होणाऱ्या 2023 स्पर्धेसाठी इंडोनेशियाच्या स्पर्धकांची निवड करण्यासाठी जकार्ता येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. युनायटेड स्टेट्सच्या R'Bonney Gabriel ने 2022 ची स्पर्धा जिंकली. 1996 ते 2002 दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या सह-मालकीच्या मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनद्वारे चालविण्यात येणारी ही स्पर्धा 1952 पासून सुरू आहे.