Wrestlers Protest (PC - ANI/Twitter)

Wrestlers Protest: ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि राष्ट्रकुल पदक विजेती विनेश फोगट (Vinesh Phogat) यांच्यासह भारताचे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघ (WFI) आणि त्याचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात पुन्हा निषेध करण्यासाठी नवी दिल्लीतील जंतरमंतरवर परतले आहेत. 3 महिन्यांनंतर कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा निषेध करण्यास सुरुवात केली आहे.

रविवारी, प्रसारमाध्यमांशी बोलताना साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी सांगितले की, एका अल्पवयीनासह अनेक महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाबद्दल दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांना जंतरमंतरवर परत जाण्यास भाग पाडले आहे. कुस्तीपटूंनी तपशीलवार माहिती दिली की, त्यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. परंतु, अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. (हेही वाचा -Tricolor Insult: मांसाच्या दुकानात तिरंग्याने चिकनची सफाई; सोशल मीडियावर युजर्सचा संताप, आरोपीला अटक (Watch))

आम्ही सीपी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. दोन दिवस झाले, पण अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. सात महिलांनी तक्रार केली, ज्यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. यात पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला, पण अद्याप काहीही केले नाही, असं साक्षी मलिकने यावेळी सांगितलं.

जानेवारीमध्ये जेव्हा कुस्तीपटू रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांनी WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कुस्तीपटूंचा मानसिक छळ करण्यात आला आणि त्यांनी याविरोधात बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. डब्ल्यूएफआय निधीच्या गैरव्यवहारात सहभागी असल्याचा आरोपही कुस्तीपटूंनी केला.

तथापी, विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि रवी कुमार दहिया यांनी जानेवारीत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली होती. क्रीडा मंत्रालयाने आंदोलक कुस्तीपटूंच्या समस्या ऐकून घेतल्या आणि आरोपांची चौकशी करण्यासाठी मेरी कोमच्या अध्यक्षतेखाली एक निरीक्षण समिती स्थापन केली. समितीला अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली होती, मात्र ती अनेकवेळा वाढवण्यात आली.

पर्यवेक्षण समितीचा अहवाल सार्वजनिक करावा आणि WFI आणि त्याच्या अध्यक्षांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलक कुस्तीपटूंनी रविवारी केली. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही समितीतील लोकांशी, क्रीडा मंत्रालयातील लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचा फोन कोणीही उचलला नाही, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहू, विनेश फोगट यांनी रविवारी सांगितले. तीन महिने झाले तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळेच आम्ही न्याय मागण्यासाठी पुन्हा इथे आलो आहोत. न्याय मिळेपर्यंत आम्ही इथेच झोपू, असंही विनेश फोगट यांनी सांगितले.