टूथपेस्ट समजून उंदराच्या विषाने दात घासल्याने एका महिलेचा मृत्यू
(संग्रहित प्रतिमा)

टूथपेस्ट समजून उंदराच्या विषाने दात घासल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. कर्नाटक (Karnataka) राज्यातील उडपी (Udpi) जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. संबधित महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले. उंदीर मारण्याचे औषध पूर्णपणे शरिरात भिनल्यामुळे रुग्णालयात 5 दिवस उपचार करुनही डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवण्यात अपयश आले. याप्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद करुन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

लीला करकेला (57) असे या दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. लीला करकेला 19 नोव्हेंबर रोजी सकाळी पहाटे 5 ला उठल्या होत्या. त्यानंतर त्या नेहमीप्रमाणे दात घासण्यासाठी गेल्या. लीला यांची झोप पूर्ण झाली नव्हती. त्यावेळी त्यांना टूथपेस्ट आणि उंदराच्या औषधामध्ये फरक समजला नाही. दात घासून परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. परंतु, काही काळानंतर त्यांची तब्येत अधिकच बिघडल्यामुळे कुटुंबियांनी त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तब्बल 5 दिवस मृत्युसी झुंज देत लीला यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशीला सरुवात केली आहे. हे देखील वाचा- नवी मुंबई: दहावीच्या विद्यार्थिनीचा शाळेत परिक्षेदरम्यान दुर्दैवी मृत्यू

रोजच्या वापरातील वस्तू आणि किटक नाशक यांना एकाच ठिकाणी ठेवू नये, असे अनेकदा आपल्याला सांगितले जाते. ज्यांच्या घरात लहान मुले असतील अशा लोकांनी यासंदर्भात अधिक काळजी घेतली पाहिजे, असे अवाहन रुग्णालयातून सर्वांना केले जाते.