मैदानावर क्रिकेट खेळत असताना, हृदयविकाराच्या झटक्याने क्रिकेटपटूचा मृत्यू
राजेश घोडके (संग्रहित - संपादित प्रतिमा)

गोवा : मैदानावर क्रिकेट खेळत असताना ह्रदयविकाराचा (Heart Attack) तीव्र झटका आल्याने, 44 वर्षीय क्रिकेटपटू राजेश घोडगे (Rajesh Ghodge) यांचे निधन झाले असल्याची बातमी आहे. मडगाव क्रिकेट क्लबने, क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित केलेल्या सामन्यात राजेश घोडके खेळत होते. नॉन-स्ट्राईक एंडवर उभे असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. वेळेचे भान राखून त्यांना ताबडतोब हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. मात्र पोहचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजेश हे गोव्याचे माजी क्रिकेटपटू होते.

मडगावच्या राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर एमसीसी मेंबर्स टूर्नामेंट चालू होती. 31 रनवर नाबाद खेळत असतानाच राजेश यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते मैदानातच कोसळले. लगेच त्यांना इएसआय रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांना काही औषधे देण्यात आली तसेच काही प्राथमिक उपचार केले गेले. त्यानंतर त्यांना व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रसिध्द डॉक्टर राखी घोडगे यांचे ते पती असून मडगावच्या नगरसेविका शरद प्रभूदेसाई यांचे ते जावई होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे.  उदय़ा सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील. (हेही वाचा : मुंबई: क्रिकेट खेळताना हृदय विकाराचा झटका; क्रिकेटपटूचा मृत्यू)

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईतल्या भांडूप येथेही एका 24 वर्षाच्या मुलाचा क्रिकेट खेळत असताना, हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. वैभव केसरकर असे या मुलाचे नाव होते.