मुंबई: क्रिकेट खेळताना हृदय विकाराचा झटका; क्रिकेटपटूचा मृत्यू
Vaibhav Kesarkar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

वय वर्षे अवघे २४ असलेल्या वैभव केसरकर (Vaibhav Kesarkar) नावाच्या एका युवा खेळाडूचा (Youth Cricket Player) क्रिकेट खेळताना मृत्यू झाला. मुंबईतील भांडूप (Bhandup in Mumbai) येथे क्रिकेट स्पर्धा सुरु होती. स्पर्धा सुरु असतानाच वैभवला हृदयविकाराच झटका आला. प्रकृती बिघडल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

वैभव केसरकर हा गवावदेवी पॅकर्स संघाकडून खेळत होता. तो उत्कृष्ठ फलंदाज होता. भांडूप येथे 23 डिसेंबर रोजी टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरु होत्या. या स्पर्धेत वैभव फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. दरम्यान, अचानकपणे त्याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्याने फलंदाजी करणे अर्ध्यावरच थांबवले आणि त्याने डाव अर्ध्यावरच सोडून मैदानाबाहेर जाऊन खूर्चीवर बसला. दरम्यान, काही काळ जाऊनही छातीत दुखणे थांबले नसल्याने त्याला नजिकच्या भावसार रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने ईसीजी काढला. त्यात वैभवला कार्डियाक अॅटॅक आल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी उपचार सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. (हेही वचाा, मुंबई: धावती लोकल पकडताना आयटी इंजिनिअरचा मृत्यू; दादर रेल्वेस्थानकातील घटना)

क्रिकेटपटू असल्याने वैभव नेहमीच क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेत असे. गेली अनेक वर्षे तो भांडूप आणि इतर काही संघांमधून खेळत होता. दरम्यानच्या काळात त्याचे कुटुंबीय दिवा येथे राहायला गेले. मात्र, तरीही वैभवची नाळ भांडूपशी कायम होती. सतत हसतमुख आणि उमदा खेळाडू अशी त्याची ओळख होती. त्याच्या जाण्याने कुटुंबीय आणि मित्रपरिवारांसह स्थानिक क्रिकेट वर्तुळालाही धक्का बसला आहे.