'प्रवाशांनो सावधान! लक्षात ठेवा. धावत्या ट्रेनमध्ये चढू किंवा उतरु नका. असे करणे आपल्या आयुष्यासाठी धोकादायक ठरु शकते', अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केली जाते. '..पण, लक्षात कोण घेतो' या म्हणीप्रमाणे अनेकजण त्याकडे उद्दामपणे दुर्लक्ष करतात. असाच उद्दामपणा एका आयटी अभियंत्याच्या जीवावर बेतला. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर रविवारी (७ ऑक्टोबर) ही घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
सुदर्शन सुजीतकुमार चौधरी (वय ३२ वर्षे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पेशाने तो अभियंता होता. मुळचा नागपूरचा असलेला सुदर्शन कर्जतला जाण्यासाठी दादरला आला होता. दरम्यान, फलाट क्रमांक एकवरुन त्याने धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकलने वेग घेतल्यामुळे तो फलाटावर फेकला गेला. जखमी अवस्थेत असलेल्या सुदर्शनला सीआरपीएफ जवानांनी त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
सुदर्शनच्या खिशात असलेल्या पाकीट आणि मोबाईलवरुन पोलिसांनी त्याच्या घरच्यांना अपघाताबाबत माहिती दिली.