खंडणीबाबत (Extortion) होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या तरुण मुलीसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुजरातमध्ये समोर आली आहे. बलवंतसिंह ठाकोर आणि त्यांची 22 वर्षीय मुलगी प्रज्ञा यांचे मृतदेह रविवारी गोध्राजवळील भामैया गावात तलावातून बाहेर काढण्यात आले. अहवालानुसार, दोन जण बलवंतसिंह यांना खंडणीसाठी धमकावत होते. पैसे न दिल्यास कुटुंबीयांना इजा करण्याची धमकी दिली होती. सतत होणारा हा त्रास सहन न झाल्याने बलवंतसिंह यांनी आपल्या मुलीसह आत्महत्या केली. लवंतसिंह यांना नुकताच त्यांच्या जमिनीसाठी नऊ कोटी रुपयांचा सरकारी मोबदला मिळाला होता. ठाकोर यांनी आत्महत्येआधी सुसाईड नोट लिहिली होती, ज्यामधून त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आले. मगन वनकर आणि हार्दिक नावाच्या दोन लोकांकडून कथित छळाचा तपशील त्यांनी या चिट्ठीमध्ये नमूद केला आहे.
अहवालानुसार, आपल्या मुलीसह तलावात उडी मारण्यापूर्वी ठाकोर यांनी त्यांचा पुतण्या अभिजितसिंह राठोड याला फोन करून मंदिरातील खात्यांच्या स्लिप्स तपासण्यास सांगितले होते. त्यानंतर रविवारी बलवंतसिंह आणि त्यांच्या मुलीच्या मृत्यूची बाब समोर आली. जेव्हा मंदिरातील स्लिप तपासल्या गेल्या, तेव्हा मंदिराच्या हिशेबाच्या ऐवजी त्यामध्ये ठाकोर यांना वनकर आणि हार्दिककडून कसा त्रास दिला जात होता, याचा तपशील देण्यात आला होता. (हेही वाचा; Noida Shocker: नोएडातील महिलेने दोन मुलींसह चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दोघींचा मृत्यू, एक मुलगी रुग्णालयात दाखल)
ठाकोर यांनी पत्रांमध्ये नमूद केले आहे की, भारतीय अन्न महामंडळ (FCI) गोदामासाठी त्यांनी त्यांची जमीन दिली होती. त्याबदल्यात त्यांना जमिनीची भरपाई म्हणून नऊ कोटी रुपये मिळाले. याची माहिती वनकर आणि हार्दिक यांना मिळाली. त्यानंतर हार्दिक आणि वनकर यांनी ठाकोर यांच्याकडून पैसे उकळण्यास आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाहीत तर कुटुंबातील एका व्यक्तीला मारण्यात येईल अशी धमकी त्यांनी दिली. या त्रासाला कंटाळून ठाकोर यांनी आपल्या मुलीसह तलावात उडी मारली. या घटनेनंतर नातेवाइकांनी ठाकोर यांचा फोन तपासला असता, कॉल लॉगमध्ये हार्दिकचे अनेक फोन आल्याचे दिसून आले. त्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सध्या पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.