भारताच्या संरक्षण विभागासाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेने सुमारे 2.4 अब्ज डॉलर किमतीचे 24 बहुपयोगी ‘एमएच 60 रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टर (MH-60 Romeo Seahawk helicopters) च्या विक्रीसाठी भारताला मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. ही हेलिकॉप्टर्स भारताच्या ताफ्यात आल्यावर भारताची ताकद अजून वाढणार आहे, कारण गेल्या एक दशकापासून भारताला या हंटर हेलिकॉप्टरची आवश्यकता होती. लॉकहीड मार्टिनद्वारा निर्मित हे हेलिकॉप्टर पाणबुड्या आणि जहाजांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम आहेत. हे हेलिकॉप्टर समुद्रात शोध घेण्यासाठी तसेच बचाव कार्यांसाठीही उपयोगी ठरणार आहे.
मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने 24 एमएच 60 आर बहुपयोगी हेलिकॉप्टरच्या विक्रीस मंजुरी दिली. हे हेलिकॉप्टर भारतीय सुरक्षा दलांना पाणबुडी आणि पाणबुडीविरोधी युद्ध मोहिम यशस्वीपणे पार पाडण्यास सक्षम करतील. अमेरिकेने अधिसूचनेत म्हटले आहे की, प्रस्ताविक विक्रीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक संबंध आणखी मजबूत होतील. त्याचबरोबर अमेरिकेची विदेश नीती आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होण्यास मदत मिळेल. (हेही वाचा: लष्करी सामर्थ्यात भारत जगात चौथ्या क्रमांकावर; पाकिस्तान कितव्या स्थानवर?)
या हेलिकॉप्टर्सना जगातील सर्वात अत्याधुनिक सागरी हेलिकॉप्टर मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते हिंद महासागरात चीनचे आक्रमक धोरण पाहता भारतासाठी ‘एमएच 60 रोमिओ सी हॉक’ हेलिकॉप्टर आवश्यक होते. हिंद पॅसिफिक आणि दक्षिण आशिया प्रदेशात राजकीय स्थिरता, शांती तसेच आर्थिक प्रगती करण्यासाठी या हेलिकॉप्टरच्या विक्रीमुळे फायदा होणार आहे.