जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान (Photo: @mpparimal/Twitter)

World's Largest Cricket Stadium : क्रिकेट... भारतीयांचा जीव की प्राण, सध्याच्या घडीला जवळ जवळ प्रत्येक भारतीयाला आपल्या क्रिकेट टीमचा अभिमान आहे. भारतात टीव्हीवर क्रिकेट पाहणाऱ्यांची संख्या तर आहेच, मात्र स्टेडियमवर जाऊन प्रत्यक्ष क्रिकेटचा आस्वाद घेणारेही अनेक लोक आहेत. क्रिकेटप्रेमींच्या या भारत देशात सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय मैदाने आहेत. भारतात एकूण 52 आतंरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (Cricket Stadium) आहेत. भारतानंतर इंग्लंडमध्ये सर्वाधिक 23 क्रिकेट स्टेडियम आहेत. अशातच भारतात आता जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आकार घेत आहे. होय अहमदाबाद येथील 'सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम' (Sardar Patel Stadium) चा कायापालट करण्यात येणार असून हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे. भारताने 2011 सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमान पद भूषविले होते, त्यानंतर आता 2023 सालच्या यजमानपदाच्या तयारीचे दृष्टीने या मैदानाचे काम चालू आहे. (हेही वाचा : पुणे: गहुंजे मैदानाचा प्रतिकात्मक ताबा बँक ऑफ महाराष्ट्रकडे)

सध्या जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम म्हणून मेलबर्न स्टेडियमकडे पहिले जाते. ज्याची आसनक्षमता 90 हजार इतकी आहे. तर कोलकाताचे इडन गार्डन स्टेडियम हे भारतातील सध्याचे सर्वात मोठे स्टेडियम आहे. इडन गार्डन स्टेडियमची आसनक्षमता 66 हजार इतकी आहे. मात्र आत भारतात या स्टेडियमपेक्षाही मोठे मैदान बनत आहे, ज्याची सुरुवात 2017 पासूनच झाली आहे. तब्बल 63 एकर जागेत हे मैदान बनत असून, तब्बल 1 लाख 10 हजार प्रेक्षक या मैदानावर बसू शकतात. ‘लार्सन अँड टूब्रो’ ही कंपनी हा मेकओव्हर करत आहे.

अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम साकारण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते. त्यानुसार हे मैदान बनत आहे. या स्टेडियमसाठी अंदाजे 700 कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या नवीन स्टेडीयममध्ये 3 प्रॅक्टीस ग्राउंड, 1 इनडोअर क्रिकेट अॅकेडमी, क्लबहाउस आणि स्विमिंग पूल याचाही समावेश असणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक संख्या सांभाळून त्यांच्या सुरळीत प्रवेशाचा आणि ट्राफीकच्या समस्या उद्भवणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेऊन या स्टेडियमची रचना करण्यात येत आहे. 2019 मध्ये या स्टेडियम काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.