Rat (PC - Twitter)

Rat Murder Case: उत्तर प्रदेशातील बदायूं येथील मनोज या तरुणाला उंदीर मारणे चांगलेचं महागात पडले आहे. उंदीर मारल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 30 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे. ही घटना गेल्या वर्षी 25 नोव्हेंबरची आहे. आरोपी मनोजविरुद्ध सदर कोतवाली येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

मागील वर्षी 25 नोव्हेंबर रोजी सदर कोतवाली परिसरातील पानबरिया येथील रहिवासी मनोज कुमार यांनी घरातून उंदीर पकडला होता. त्याने उंदराच्या शेपटीला एक दगड बांधला आणि तो घराबाहेरील नाल्यात बुडवायला सुरुवात केली. दरम्यान, प्राणीप्रेमी विकेंद्र शर्मा तेथून जात होते. विकेंद्रने मनोजला असे करण्यापासून रोखले असता त्याने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. (हेही वाचा -Viral Video: कायदेशीर कागदपत्रांवर मृत महिलेच्या हाताचे ठसे घेणार्‍या व्यक्तीचा व्हिडिओ वायरल; अमानवीय कृतीवर नेटिझन्स कडून संतप्त प्रतिक्रिया)

दोघांमध्ये वाद झाला असता विकेंद्रने पोलिसांना बोलावले. विकेंद्रने आरोपी मनोजविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचा आग्रह धरण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच दिवशी आरोपीला पकडून पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर आयव्हीआरआय, बरेली येथे उंदराचे शवविच्छेदन करण्यात आले.

पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर विकेंद्र एफआयआर नोंदवण्यावर ठाम राहिला. त्यानंतर विकेंद्रच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत तक्रार नोंदवली. नंतर मनोजची कच्च्या जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिसांनी उंदीर हत्या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला.

सुमारे पाच महिन्यांत तपासाअंती पोलिसांनी उंदीर हत्या प्रकरणात आरोपी मनोजविरुद्ध 30 पानी आरोपपत्र तयार केले. उंदीर मारल्याचा आरोप असलेल्या आरोपीविरोधात प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.