Tamil Nadu Hooch Tragedy: कल्लाकुरिची दुर्घटनेतील मृतांची संख्या 59 वर: जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती समोर
Photo Credit- X

Tamil Nadu Hooch Tragedy: तामिळनाडूतील कल्लाकुरिची (Kallakurichi) येथे विषारी दारू प्यायल्याने 59 जणांचा मृत्यू झाला आहे. कल्लाकुरिची टाउन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील करुणापुरम भागात 18 जून रोजी ही घटना घडली. मृत रोजंदारी मजूर(Laborer Death)होते. या सर्वांनी करुणापुरमच्या एका विक्रेत्याकडून दारू खरेदी केली होती. दारूच्या विषबाधेमुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. तर, उपचार घेत असलेल्या लोकांना प्रत्येकी 50,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय, माजी न्यायमूर्ती बी गोकुळदास यांचा समावेश असलेल्या एक सदस्यीय आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी 3 महिन्यांत अहवाल सादर करण्याची घोषणा केली.

या घटनेचा सध्या तपास सुरू आहे. संबंधीत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी श्रावणकुमार जटवथ यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी एमएस प्रशांत यांची कल्लाकुरिची जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. कल्लाकुरिचीचे एसपी समयसिंह मीना यांनाही निलंबित करण्यात आले. रजत चतुर्वेदी यांची नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी 18 जून रोजी ही घटना घडल्यानंर मृत्यूंबद्दल शोक व्यक्त केला आहे. "कल्लाकुरिची येथे मद्य प्राशन करणाऱ्या लोकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला. या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. ते रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्यांबद्दल जनतेने माहिती दिल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. समाज बिघडवणारे असे गुन्हे थांबवले जातील," असे एमके स्टॅलिन म्हणाले होते.