Ram Jethmalani (Photo: IANS)

ज्येष्ठ वकील राम जेठमलानी (Ram Jethmalani) यांचे आज (8 सप्टेंबर) निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी दिल्लीमध्ये (Delhi) त्यांचे निधन झाले आहे. राम जेठमलानी यांना प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर म्हणून ओळखले जात असे. जेठमलानी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचे मारेकरी सतवंत सिंग आणि केहर सिंग यांच्यातर्फे खटला लढवला होता. यामुळे अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती. याप्रमाणेच संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरू ते सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणातील अमित शहा यांची केस राम जेठमलानी यांनी लढवली होती.

 

राम जेठमलानी यांच्याविषयी थोडक्यात माहिती

राम जेठमलानी यांचा जन्म 14 सप्टेंबर 1923 साली पाकिस्तान मधील सिंध प्रांतातील शिकारपूर येथे झाला. वयाच्या 17 व्या वर्षी राम जेठमलानी यांनी वकील म्हणून पदवी मिळवली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये राम जेठमलानी यांनी केंद्रीय कायदा मंत्री म्हणून पद भूषवले होते. त्यानंतर पक्षातून 6 वर्षांसाठी हाकलपट्टी करण्यात आली होती. त्यावेळेस जेठमलानी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधातच निवडणूक लढवण्यास मैदानात उतरले. सध्या ते राष्ट्रीय जनता दलाकडून राज्यसभेवर खासदार होते.हे देखील वाचा- Ram Jethmalani Dies: पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी यांच्या सह दिग्गजांकडून राम जेठमलानी यांना श्रद्धांजली; अमित शहा यांनी घेतले राहत्या घरी अंतिम दर्शन

 

चारा घोटाळा प्रकरण

देशातील सर्वात मोठया घोटाळ्यांमध्ये पशुखाद्य म्हणजेच चारा घोटाळ्याचे नाव घेतले जाते. बनावट देयके सादर करून बिहार सरकारच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये काढून घेण्यात आले होते. ही रक्कम सनदी अधिकारी, पशुपालन विभागातील अधिकारी व राजकीय नेत्यांच्या संगनमतातून काढण्यात आली होती. आधी छोट्यामोठ्या प्रकरणांतून आणि नंतर मोठया प्रकरणांतून हा घोटाळा उघड झाला. त्यानंतर राजकीय नेत्यांची कट-कारस्थाने उघड होऊ लागली. चारा घोटाळा प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या विरोधातील खटल्यात जेठमलानी यादव यांची बाजू कोर्टात मांडली होती.

 

बेहिशोबी संपत्ती प्रकरण

जयललिता या मुख्यमंत्री असताना म्हणजेच 1991 ते 1996 या पहिल्या कारकीर्दीशी संबधित हा खटला होता. जयललिता, एकेकाळच्या त्यांच्या निकटवर्ती सहकारी शशिकला नटराजन आणि यांची भाची इलावरासी आणि भाचा व्ही.एन. सुधाकरन यांनी भ्रष्टचार करुन 66.65 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप होता. यामुळे तामिळनाडू सरकारच्या दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंध संचालयाने हा खटला 1996 मध्ये दाखल केला होता. या बेहिशेबी संपत्ती प्रकरणात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या वतीनेही त्यांनी खटला लढवला होता.

 

2जी घोटाळा प्रकरण

विशेष म्हणजे 2008 मध्ये 2जी स्पेक्ट्रम वाटप झाले असले तरी 2001 मधील दरानुसार हे वाटप करण्यात आले होते. तसेच स्पेक्ट्रम वाटप करताना ते काही काळासाठी इतरांना विकता येणार नाही, अशी अटही केली नव्हती. त्यामुळे सुरुवातीला कंपन्यांनी कमी दरात स्पेक्ट्रम मिळवले आणि नंतर चढ्या दराने बाजारात विकले. सीबीआयने या प्रकरणात खासदार कनिमोळी यांना अटक केली होती. यूपीएच्या कार्यकाळात 2 जी घोटाळा उघड झाला होता. या प्रकरणात जेठमलानी यांनी कनिमोळी यांच्या वतीने खटला लढवला होता.

 

बेकायदा खाणकाम

बेकायदा खाणकामासाठी मुख्यमंत्री येदियुरप्पा, चार कॅबिनेट मंत्री, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि 500 अधिकारी जबाबदार. तसेच एका कंपनीने येदियुरप्पा यांच्या कुटुंबाच्या ट्रस्टला एक कोटीची जमीन खरेदी करण्यासाठी 20 कोटी रुपये दान म्हणून दिले आहेत. बेकायदा खाणकामासाठी प्रकरणात राम जेठमलानी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्यासह अन्य 12 आरोपींच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली होती.

 

केएम नानावटी विरुद्ध महाराष्ट्र खटला

केएम नानावटी विरुद्ध महाराष्ट्र खटला सर्वाधिक चर्चेत होता. नानावटी नौदल अधिकारी होते. त्यांनी पत्नीच्या प्रियकराला गोळ्या घातल्या होत्या. त्यांनी शरणागती पत्करून गुन्ह्याची कबुलीही दिली होती. 3 वर्षे ते तुरुंगात होते. जेठमलानी यांनी हा खटला लढला होता आणि त्यांची सुटका केली होती.

 

इतर

-तस्करीच्या एका प्रकरणात कुख्यात गुंड हाजी मस्तानविरोधातील खटल्यात त्याची बाजूही मांडली होती.

-शाहबुद्दीन आणि प्रजापती यांच्या बनावट चकमक प्रकरणात गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री आणि सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाजूने खटला लढवला होता.

-संसदेवरील हल्ल्यातील आरोपी दहशतवादी अफजल गुरूविरोधातील खटल्यातही जेठमलानी यांनी युक्तिवाद केला होता. अफजलला फाशीची शिक्षा सुनावली होती.

-हायप्रोफाइल जेसिका लाल हत्या प्रकरणात जेठमलानी यांनी आरोपी मनु शर्माची बाजूही त्यांनी न्यायालयात मांडली होती.

खटला कोणताही असो, राम जेठमलानी त्यावर प्रचंड मेहनत घ्यायचे. देशातील सर्वात महागडे वकील म्हणून त्यांची ख्याती होती. मिळालेल्या माहितीनुसार, राम जेठमलानी यांची फी एक कोटीपर्यंत होती.