मी माझं जीवन संपवत आहे, जेणेकरून काहीतरी तोडगा निघू शकेल; गाझीपूर बॉर्डरवर आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या 38 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सीमेवर, थंडीमध्येही शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील यूपी गेटवर मोठ्या संख्येने शेतकरी जमले आहेत. सरकारने नवीन कायदा रद्द करावा, या मागणीवर ते ठाम आहेत. शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात वाटाघाटी होणार आहेत. सरकारशी होणाऱ्या चर्चेपूर्वी एका शेतकऱ्याने शौचालयात लटकून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेने दिलेल्या मोबाइल टॉयलेटमध्ये वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केली. कश्मीर सिंह असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 75 वर्षीय कश्मीर सिंह हे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील बिलासपूर तहसील भागातील रहिवाशी होते. विशेष म्हणजे कश्मीर सिंह यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाइड नोटही सापडली आहे. आपल्या सुसाईड नोटमध्ये कश्मीर सिंह यांनी लिहिलं आहे की, जिथे माझा मृत्यू झाला तिथेचं माझ्यावर नातवाने अंत्यसंस्कार केले पाहिजेत. माझा अंत्यविधी दिल्ली-यूपी सीमेवरचं करावा. (हेही वाचा - Buta Singh Passes Away: काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री बूटा सिंह यांचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवीन जिंदल, राहुल गांधी यांनी ट्विटवर वाहिली श्रद्धांजली)

कश्मीरने आपल्या आत्महत्येस सरकार जबाबदार असलेल्याचं म्हणत सरकारला पत्र लिहिलं आहे की, हिवाळ्याच्या दिवसात आम्ही किती दिवस या ठिकाणी बसणार आहोत. हे सरकार ऐकत नाही, म्हणून मी माझा जीव देणार आहे, जेणेकरून कोणतातरी तोडगा निघू शकेल. (हेही वाचा - Farmers Protest: शेतकरी आंदोलन- केंद्र सरकार पुन्हा करणार चर्चा; बैठकीकडे देशाच्या नजरा)

भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रदेश प्रमुख बिजेंद्र यादव यांनी सांगितले की, गुरूवारी थंडीमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एका दिवसानंतर कश्मीर सिंहने आत्महत्या केली. कश्मीर सिंह यांचा कृषी विधेयकाला विरोध होता. सध्या कश्मीर सिंह यांचा मुलगा आणि नातू देखील शेतकरी चळवळीत सहभागी आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी मृत कश्मीर सिंह यांची सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे.