Srinagar Terror Attack: श्रीनगर येथे दहशतवादी हल्ला; गोळीबारात 2 पोलीस कर्मचारी शहीद, 12 जखमी
Jammu and Kashmir. (Photo Credits: ANI)

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) श्रीनगरमधील पंथा चौक (Pantha Chowk) भागातील झेवानमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले आहेत, तर 12 जवान जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना घेऊन जाणाऱ्या बसवर हा हल्ला झाला. ही बस जम्मू-काश्मीरच्या 9 व्या बटालियनच्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

काश्मीर टायगर्स नावाची कोणतीही संघटना नाही असे एका अहवालात म्हटले आहे. पोलीस आणि सुरक्षा एजन्सीची दिशाभूल करण्यासाठी, दहशतवाद्यांनी स्वतःला एक संघटना म्हणून प्रक्षेपित केले आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची माहिती मागितली आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदनाही व्यक्त केल्या आहेत.’

या घटनेची माहिती देताना, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘श्रीनगरच्या पंथा चौक भागात झेवानजवळ सायंकाळी 5.30 च्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर गोळीबार केला. या हल्ल्यात 14 जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 2 जवान शहीद झाले. मृत पोलिस कर्मचार्‍यांमध्ये एक एएसआय आणि एक निवड श्रेणीतील हवालदार आहे.’ (हेही वाचा: कृषी कायद्याविरूद्ध मागील वर्षभर लढणारे आंदोलक शेतकरी आजपासून माघारी; अनेकांनी साजरा केला आनंद)

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी बसवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलीस आणि लष्कराला लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारीही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले होते.