
लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात बेरोजगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान हातावर पोट असणाऱ्या कामगारांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे अनेकजण कर्जबाजारीही झाले आहेत. यातच आर्थिक तंगीला कंटाळून आपल्या बायकोची आणि चार मुलांची हत्या (Murder) केली आहे. त्यानंतर स्वतः ही आत्महत्या (Suicide) करून जीव दिल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना राजस्थानच्या (Rajasthan) उदयपूर (Udaipur) येथे घडली आहे. दरम्यान, खेरवाडा पोलिसांनी पती-पत्नीसह चार मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहेत. तसेच पुढील चौकशीलाही सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेरवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या रोबिया गावातील एका व्यक्तीला लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. या कारणाने त्याचे आपल्या पत्नीसोबत सतत वाद होत असे. याच मुद्द्यावरून शुक्रवारी रात्री पती-पत्नीमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर संतप्त पतीने आपल्या पत्नीची आणि चार मुलांची धारदार शस्त्राने हत्या केली. यामध्ये दोन मुली आणि दोन मुले होती. कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या केल्यानंतर या तरूणाने स्वत:ही झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Vadodara Shocking: धक्कादायक! पत्नीने लग्नाच्या दिवशी मासिक पाळी आल्याचे लपवले; पतीने मागितला घटस्फोट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरूणाचा गावातील एका झाडाला मृतदेह लटकलेला दिसला. या घटनेची माहिती देण्यासाठी गावकरी त्याच्याघरी पोहचले तर, त्याच्या घराबाहेर रक्ताचे सुखलेले डाग त्यांना दिसले. त्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच खेरवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेचे अधिकृत कारण अजून समजलेले नाही. परंतु, आर्थिक अडचणींना वैतागून तरुणाने हे धक्कादायक कृत्य केले आहे, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.