Shaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती
शक्तिकांत दास (Photo Credits: Twitter)

उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर, शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांची रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. शक्तिकांत दास हे बँकेचे 25 वे गव्हर्नर आहेत. शक्तिकांत दास हे माजी आर्थिक सल्लागार आणि वित्त आयोगाचे सदस्य आहेत. मोदींचा महत्वाचा निर्णय नोटबंदीमध्ये दास यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. अर्थ मंत्रालयात सहसचिव, तामिळनाडू सरकारमध्ये महसूल आयुक्त, उद्योग खात्यात सचिवपदासह अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. (हेही वाचा : RBI Governor उर्जित पटेल यांचा राजीनामा)

उर्जित पटेल यांची 2016 साली आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मोदींचे चेले म्हणून त्यांची चेष्टा केली गेली होती. मात्र भाजपाच्या सत्तेत आरबीआयमध्ये केंद्राची ढवळाढवळ, तसेच कोणतेही निर्णय घेण्याचे नसलेले स्वातंत्र्य अशा अनेक कारणांमुळे मोदी सरकारसोबत त्यांचे अनेक वाद चालू होते, यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी त्यांच्या पदासाठी मुदतवाढ स्वीकारण्यास नकार दर्शवला होता त्यावेळी जशी खळबळ उडाली होती तशीच स्थिती उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर उद्भवली आहे.