Cyber Crime In Uttar Pradesh: अलीकडे सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बलिया जिल्ह्यातील (BalliaDistrict) एका सामान्य कुटुंबातील मुलीच्या खात्यात चक्क 10 कोटी रुपये जमा झाले आहेत. विशेष म्हणजे या मुलीला आपलं पासबुक अपडेट करताना याविषयी माहिती मिळाली. त्यानंतर या मुलीने यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सध्या सोशल मीडियावर ही बातमी वेगाने व्हायरल होत आहे.
संबंधित मुलीने यासंदर्भात तक्रार केल्यानंतर तिचं अकाऊंट फ्रिज करण्यात आलं आहे. प्राप्त माहितीनुसार, बलिया जिल्ह्यातील रुकूनपुरा गावातील सरोज या मुलीचं अलाहाबादच्या बँकेत खाते आहे. सरोजच्या खात्यात कोणीतरी 9 कोटी 99 लाख रुपये जमा केले आहेत. याविषयी सरोज आणि तिच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती नव्हती. मात्र, एक दिवस पासबुक अपडेट करण्यासाठी गेल्यानंतर तिला आपल्या खात्यात 10 कोटी रुपये जमा झाल्याचं समजलं. ही रक्कम ऐकल्यानंतर सरोज आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यानंतर सरोजने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली. (हेही वाचा - Indore Gang Rape Case: मुंबईतील 2 मॉडेल्सवर मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये सामूहिक बलात्कार; एका महिलेसह 4 जणांना अटक)
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सरोजने 2018 मध्ये अलाहाबाद बँकेत अकाऊंट उघडले होते. सोमवारी ती पासबुक अपडेट करण्यासाठी बँकेच्या शाखेत गेली. त्यावेळी तिला आपल्या खात्यात 10 कोटी रुपये जमा झाल्याचे समजले. सरोजने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 2 वर्षापूर्वी तिला निलेश नावाच्या एका व्यक्तीने फोन केला होता. त्यावेळी या व्यक्तीने सरोजला आधार आणि अन्य काही कागदपत्रे पोस्टाने पाठवण्यास सांगितले होते. असं केल्यास पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळेल, असंही या अज्ञात व्यक्तीने सांगितलं होतं. त्यानंतर सरोजला बँकेचं एटीएम मिळालं होतं. हे एटीएमदेखील तिने या व्यक्तीला पाठवलं होतं.
दरम्यान, बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सरोजच्या खात्यात अनेकदा पैसे आले आहेत. परंतु, याविषयी सरोजला कोणतीही कल्पना नव्हती. बँकेने सरोजच्या तक्रारीनंतर अकाऊंट फ्रिज करुन त्यातील व्यवहार स्थगित केले आहेत. तसेच ज्या अज्ञात व्यक्तीने सरोजला फोन केला होता. त्या व्यक्तीचा मोबाईल सध्या बंद आहे. अशिक्षित असलेली सरोज सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात सापडली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.