Indore Gang Rape Case: मुंबईतील 2 मॉडेल्सवर मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये सामूहिक बलात्कार; एका महिलेसह 4 जणांना अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Indore Gang Rape Case: मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये मुंबईतील (Mumbai) 2 मॉडेलवर (Models) सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना घटना घडली आहे. या दोन मॉडेल्सला एका इव्हेंटसाठी इंदूरला (Indore) बोलावण्यात आलं होतं. मात्र, तेथे त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना शहरातील बाणगंगा परिसरात घडली. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह इतर 4 जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 21 वर्षीय तरुणी आणि मुंबईची 22 वर्षीय तरुणी विजय नगर पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी आम्ही मॉडेलिंग करत असून काही दिवसांपूर्वी एका महिलेने फोन करून इंदूरमध्ये एका इव्हेंटमध्ये नृत्य सादर करण्याबाबत बोलावलं होतं असं सांगितलं. त्यामुळे दोन्ही तरुणी बसने 16 सप्टेंबरला इंदूरला गेल्या. त्यानंतर फोन केलेल्या महिलेचा एक साथीदार या दोन मॉडेल्सना बाणगंगा परिसरातील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये घेऊन गेला. या व्यक्तीने मॉडेल्सला इव्हेंट एक-दोन दिवसांत होईल, असं सांगितलं. (हेही वाचा - Uttar Pradesh: मुलाच्या हव्यासापोटी बापाचे धक्कादायक कृत्य; होणाऱ्या बाळाचे लिंग जाणून घेण्यासाठी गर्भवती पत्नीचे फाडले पोट)

दरम्यान, आरोपी महिलेने या दोन मॉडेल्सला इव्हेंटमध्ये नृत्य सादरीकरण करण्याबरोबरचं काही व्यक्तींसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. मात्र, यास मॉडेल्सनी नकार दिला. त्यामुळे त्यांना एका खोलीत डांबून ठेवण्यात आलं. याशिवाय त्यांना मारहाणदेखील करण्यात आली. त्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांचे अश्लील व्हिडिओ काढण्यात आले. तसेच हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित तरुणींना उपाशी ठेवून त्यांच्यावर सलग तीन दिवस अत्याचार करण्यात आले. यातील एका पीडितेची प्रकृती खालावली असून तिला धार येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

पीडित तरुणींनी स्वत:ची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्या धार पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी गेल्या. मात्र, तेथील पोलिसांनी हा प्रकार इंदूरमधील असल्याचे सांगत पीडितांना इंदूरला पाठवले. त्यानंतर इंदूरमधून पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेसह 4 जणांना अटक केली आहे.