स्त्री-पुरुष समानतेबाबत देशात सर्वत्र चर्चा सुरु असते. अनेक नेते मंडळी आपल्या भाषणांमध्ये याचा उल्लेख करतात, सोशल मिडियावरही याबाबत नेहमीच बोलणे होते. आजकाल जवळजवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. मात्र आता उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. राज्यातील बदाऊं जिल्ह्यातील एका व्यक्तीने त्याच्या गर्भवती पत्नीचे धारधार शास्त्राने चक्क पोट फाडले आहे. यामुळे महिलेचे आतडे बाहेर आले. होणाऱ्या बाळाचे लिंग (Sex) जाणून घेण्यासाठी या व्यक्तीने हे कृत्य केले आहे.
सध्या महिलेला प्रकृती चिंताजनक असून, तिला बरेलीला घेऊन जाण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन एफआयआर नोंदविला आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन परिसरातील मोहल्ला नेकपूर गल्ली क्रमांक तीन येथे राहणारा पन्नालाल याची पत्नी अनिता (वय 35) किराणा दुकान चालवते. त्यांना याआधी 5 मुली आहेत. सध्या अनिता आठ महिन्यांची गरोदर आहे. अनिताला मुलगा होत नसल्याने पन्नालाल तिला मारहाण व शिवीगाळ करतो असा आरोप अनिताच्या भावाने केला आहे. (हेही वाचा: चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून; शेतात नेऊन जाळला मृतदेह)
शनिवारी संध्याकाळी पन्नालाल व अनितामध्ये भांडण झाले, त्यांनतर पन्नालालने एका धारधार शास्त्राने आपल्या पत्नीचे पोट फाडले. गर्भात मुलगा आहे की मुलगी हे त्याला पाहायचे होते. त्यानंतर घरात गोंधळ माजला व आरडाओरडा ऐकून परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून सिव्हिल लाइन्स पोलिस घटनास्थळी आले व पोलिसांनी तातडीने महिलेला जिल्हा रुग्णालयात नेले, तिथून तिला बरेली येथे रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी पन्नालालला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
5 मुलींच्या नंतर यावेळी मुलगा झाला नाही तर आपण अनिताला मारून दुसरे लग्न करू असे पन्नालाल याआधी अनेकवेळा म्हणाला होता.