Punjab Shocker: रुग्णाच्या पोटात आढळल्या इअरफोन, नट, बोल्ट, लॉकेट, स्क्रूसह अनेक वस्तू; ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का
Surgery | Representational image. (Photo Credits: sasint/pixabay)

पंजाबमधील मोगा (Moga) येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे एका रुग्णाच्या पोटातून लॉकेट, इअरफोन आणि स्क्रू अशा अनेक वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत. हे प्रकरण मोगाच्या मेडिसिटी रुग्णालयाशी संबंधित आहे. या ठिकाणी 40 वर्षीय रुग्ण कुलदीप सिंग यांना मंगळवारी खूप ताप आला आणि उलट्या झाल्या. त्यानंतर ते डॉक्टरांकडे गेले. तिथे त्यांचा एक्स-रे काढला आणि इतर काही चाचण्या केल्या तेव्हा त्यांच्या पोटात अनेक वस्तू असल्याचे आढळून आले.

सिंग यांना अनेक वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. नुकतेच अचानक खूप जास्त पोटात दुखू लागल्याने ते दवाखान्यात गेले, तिथे डॉक्टरांना तातडीचे त्यांच्यावर ऑपरेशन करावे लागले.

यावेळी त्यांच्या पोटात राखी, स्क्रू, नट-बोल्ट, सेफ्टी पिन, लॉकेट, इअरफोन अशा 100 वस्तू सापडल्या. हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या पोटातून या सर्व गोष्टी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. सिंग यांच्या पोटात चुंबकही आढळून आले. रुग्णालयाचे संचालक डॉ. अजमेर कालरा यांच्या मते, त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीतील अशा प्रकारची ही पहिलीच घटना होती. (हेही वाचा: Uttar Pradesh Shocker: चुकीच्या इंजेक्शनमुळे मुलीचा मृत्यू, मृतदेह बाहेर फेकून डॉक्टर फरार, उत्तर प्रदेशातील खळबळजनक घटना)

रुग्ण कुलदीप सिंह यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांना बऱ्याच दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होता. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून हा पोटदुखीचा त्रास खूप वाढला होता. त्यांना झोपही येत नव्हती. याआधी त्यांना अनेक डॉक्टरांकडे नेले मात्र काहीही फरक पडला नाही. त्यानंतर त्यांना मोगा मेडिसिटीमध्ये आणण्यात आले, तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सिंग हे मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्याचवेळी त्यांचा मुलगाही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे त्यांनी सांगितले.