Indian Railways: भारत-नेपाळ दरम्यान 8 वर्षांनंतर पुन्हा धावणार रेल्वे; PM मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान दाखवणार ग्रीन सिग्नल, जाणून घ्या किती असेल भाडे
Nepal PM Sher Bahadur Deuba, PM Narendra Modi (PC - ANI)

Indian Railways: आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारत आणि नेपाळदरम्यानची रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउवा (Sher Bahadur Deuba) शनिवारी दिल्लीतील हैदराबाद हाऊस ते जयनगर-जनकपूर-कुर्था (Jayanagar-Janakpur-Kurta) या ऑपरेशनचे संयुक्तपणे उद्घाटन करतील. जयनगर आणि जनकपूर या दोन्ही ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल. हैदराबाद हाऊस दिल्ली येथे होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दोन्ही देशांच्या स्थानकांवर (जयनगर आणि जनकपूर) दाखवले जाईल. उद्घाटन कार्यक्रमासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. एसएसबी व्यतिरिक्त रॉ, इंटेलिजन्स, जिल्हा आणि नेपाळ पोलिसांचे अधिकारी सुरक्षेच्या प्रत्येक पैलूची चौकशी करत आहेत. अधिकारी, पोलिस दल आणि श्वानपथकाद्वारे ट्रॅकचे निरीक्षण केले जात आहे. रेल्वे सेवा सुरू झाल्याने दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. (हेही वाचा - Gudi Padwa 2022 Wishes: पंतप्रधान मोदींनकडून गुडीपाडव्याच्या खास मराठीत शुभेच्छा!)

भारत आणि नेपाळ दरम्यान DMU ट्रेन धावेल. या ट्रेनचा वेग 140 किमी असेल. मधुबनीच्या जयनगर-कुर्थादरम्यान धावणाऱ्या DMU ट्रेनमध्ये 1600 HP इंजिन बसवण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीनुसार आधुनिकीकरण केले आहे. ट्रेनच्या प्रत्येक डब्यात एक टॉयलेट आहे. एकूण पाच डब्यांपैकी एक एसी कोच आहे. एका ट्रेनमध्ये 1100 प्रवासी प्रवास करू शकतात.

दरम्यान, नेपाळ रेल्वे जयनगर ते जनकपूर स्टेशनसाठी नेपाळी रुपये 60 (भारतीय रुपये 37.50), जयनगर ते कुर्था प्रवासासाठी नेपाळी 70 रुपये (भारतीय रुपये 43.75) आणि AC साठी नेपाळी रुपये 300 (भारतीय रुपये 187.50) आकारेल. ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडे फोटो ओळखपत्र असणे आवश्यक आहे.