पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली धुसपूस आज वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. दिर्घकाळापासून पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांच्याकडून आग्रही भूमिका घेतली गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwarilal Purohit) यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संध्याकाळी 5 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी त्यांनी आपल्या जवळच्या आमदारांसोबत बैठक घेतली आणि त्यानंतर राजभवनात जाऊन राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवला आहे.
दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग राजीनामा देण्यासाठी राज्यपाल सभागृहात पोहोचले, तेव्हा त्यांच्या पत्नी प्रनीत कौरही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी खुलेपणाने काँग्रेस हायकमांडकडे नाराजी व्यक्त केली. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, मी आज सकाळीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये गेल्या महिन्याभरात ज्या पद्धतीने आमदारांची बैठक बोलावली गेली, त्यातून हायकमांडला माझ्यावर सशंय आहे, हे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत मी पदाचा राजीनामा दिला आहे आणि आता पक्ष ज्याला हवा असेल त्याला मुख्यमंत्री बनवू शकतो. याशिवाय भविष्यातील राजकारणाचे पर्याय खुले असल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेतही दिले आहेत. हे देखील वाचा- Bihar News: बिहारमधील शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले 52 कोटींपेक्षा जास्त रक्कम
ट्वीट-
Punjab CM Captain Amarinder Singh submits resignation to Governor Banwarilal Purohit, at Raj Bhavan in Chandigarh. pic.twitter.com/qIlYcr71L7
— ANI (@ANI) September 18, 2021
कॅप्टन अमरिंदर यांच्या कार्यशैलीमुळे संतप्त झालेल्या 40 आमदार आणि मंत्र्यांनी पक्षाच्या हायकमांडकडे तक्रार केली. आमदार आणि मंत्र्यांनी सांगितले की, मुख्य कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणे खूप कठीण आहे. यापूर्वी, हरीश रावत यांनी शुक्रवारी ट्विट केले होते आणि म्हटले होते की, राज्यातील पक्षाच्या आमदारांनी पक्षाच्या हायकमांडला पत्र लिहून विधिमंडळ पक्षाची तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज 5 वाजता होणार होती. मात्र, त्याआधीच अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.