Tokyo Quad Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियो क्वाड समिटला राहणार उपस्थित; Fumio Kishida आणि Joe Biden यांच्यासोबत होणार द्विपक्षीय बैठक
Narendra Modi | | (Photo Credit : ANI)

Tokyo Quad Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 24 मे रोजी टोकियो येथे होणाऱ्या क्वाड कंट्रीज समिट (Tokyo Quad Summit) मध्ये सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, येथे ते त्यांचे जपानी समकक्ष फुमियो किशिदा (Fumio Kishida) आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. 24 मे रोजी जपानमध्ये होणारी क्वाड समिट ही क्वाड लीडर्सची चौथी शिखर परिषद असेल.

यासंदर्भात बोलताना बागची म्हणाले की, आम्ही क्वाडला खूप महत्त्व देतो. क्वाड एकत्र काय करू शकते आणि त्याचा अर्थ काय हे दाखवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही समकालीन समस्या आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू. (हेही वाचा -Demands Survey of Jama Masjid: ज्ञानव्यापी आणि मथुरेनंतर भोपाळच्या जामा मशिदीखाली शिवमंदिर असल्याचा दावा; पुरातत्व सर्वेक्षणाची मागणी)

रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान क्वाडची बैठक महत्त्वाची -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन क्वाड समिटसाठी जपानला जाणार आहेत. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने ही माहिती दिली. रशिया आणि युक्रेनच्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेच्या प्रमुख नेत्यांची ही क्वाड बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन म्हणाले, "आम्हाला विश्वास आहे की, ही भेट भारत-पॅसिफिक क्षेत्रासाठी राष्ट्राध्यक्ष बिडेन यांची रणनीती पूर्णपणे प्रतिबिंबित करेल आणि युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी अमेरिका पुढाकार घेऊ शकते हे दर्शवेल." बिडेन यांचा परदेश दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा त्यांना देशांतर्गत स्तरावर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.