Demands Survey of Jama Masjid: ज्ञानव्यापी आणि मथुरा मशिदीनंतर आता मध्य प्रदेशातील मशीदही मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. मध्य प्रदेशच्या संस्कृती बचाव मंचने गुरुवारी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना निवेदन सादर करून भोपाळमधील जामा मशिदीचे (Jama Masjid) पुरातत्व सर्वेक्षण करण्याची मागणी केली. संस्कृती बचाओ मंचचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी यांनी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना पत्र लिहून पुरातत्व विभागाला मशिदीचे सर्वेक्षण करण्याची विनंती केली आहे. भोपाळ चौक बाजारपेठेत असलेल्या जामा मशिदीच्या आत शिवमंदिर असल्याचा दावा संस्कृती बचाव मंचने केला आहे.
भोपाळचे आठवे शासक चंद्रशेखर तिवारी यांच्या मते, कुदेशिया बेगम यांनी त्यांच्या हयात-ए-कुदीस या आत्मचरित्रात भोपाळची जामा मशीद शिवमंदिर पाडून बांधल्याचे नमूद केले आहे. संस्कृती बचाओ मंचच्या प्रमुखाने पुढे दावा केला की, बेगम यांनी असेही नमूद केले आहे की या मशिदीचे बांधकाम 1832 मध्ये सुरू झाले आणि 1857 मध्ये पूर्ण झाले. तसेच या बांधकाम कामावर 5,00,000 रुपये खर्च झाले. (हेही वाचा - Krishna Janmabhoomi-Shahi Idgah Dispute: मथुरा कृष्ण जन्मभूमी वादावर सुनावणी होणार; जिल्हा न्यायालयाने दिली परवानगी)
जामा मशिदीच्या चौकशीच्या मागणीबाबत चंद्रशेखर तिवारी म्हणाले की, आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत जेणेकरून सर्व काही स्पष्ट होईल. देशात सर्वांसमोर मथुरा, काशी आणि अयोध्या या तीन मशिदी आहेत. अयोध्येचा निकाल आला आहे. आपल्याकडे 30 हजार मशिदींची यादी आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. ही धार्मिक स्थळे मोठ्या मनाने हिंदू समाजाच्या ताब्यात देऊन स्वागतार्ह पाऊल उचलावे, अशी मागणीही संस्कृती बचाव मंचने मुस्लिम समाजाकडून केली आहे.
सध्या देशात ज्ञानव्यापी मशिदीवरून वाद सुरू आहे. मशिदीतील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. विशेष न्यायालयाचे आयुक्त विशाल सिंह यांनी गुरुवारी वाराणसी न्यायालयात दुसरा 12 पानी सर्वेक्षण अहवाल सादर केला. यापूर्वी माजी आयुक्त अजय मिश्रा यांनी न्यायालयात दोन पानी सर्वेक्षण अहवाल सादर करताना मशिदीमध्ये हिंदू देवतांच्या आकृत्या सापडल्याचा दावा केला होता.