2019 च्या समारोपासाठी आता अवघा एक आठवडा शिल्लक आहे, या वर्षात राजकीय वर्तुळ यंदा प्रचंड लक्षवेधी ठरले, लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, विविध विधयेकांची अंमलबजावणी इत्यादी मुळे राजकारण हा नेहमी चर्चेचा मुद्दा ठरला होता. देशातील जनतेमध्ये राजकीय जागरूकता निर्माण होत असताना या जनतेचा आवाज बनणारे काही थोर राजकारणी मात्र काळाच्या पडद्याआड होत होते. यामध्ये भाजप नेत्या व माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj), संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar), अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांच्यापासून ते माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन (T. N. Sheshan) या सर्व मातब्बर मंडळींचा समावेश आहे. भारताच्या राजकारणात एकेकाळी महत्वाची भूमिका पार पाडलेल्या कोणकोणत्या नेत्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी यंदा आपला निरोप घेतला हे आपण जाणून घेणार आहोत..
सुषमा स्वराज
माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या अग्रेसर नेत्या सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्ट 2019 रोजी कार्डियाक अरेस्ट मुळे स्वराज यांचे दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झाले. यावेळी त्यांचे वय 67 वर्ष इतके होते. सुषमा स्वराज हे सबळ महिलेचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय राजकारणातील महत्वाचे नाव होते. दिल्लीच्या पहिल्या वाहिल्या महिला मुख्यमंत्री, हरियाणा सरकार मधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री तसेच 7 वेळा खासदार व 3 वेळा आमदार व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री बनून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द गाजवली होती. देशाबाहेरील सर्व अडल्या नडलेल्यांना नेहमीच मदत करणाऱ्या नेत्या म्ह्णून सुषमा यांची ओळख होती.
मनोहर पर्रीकर
मनोहर पर्रीकर यांनी 17 मार्च 2019 साली प्रदीर्घ आजारपणामुळे शेवटचा श्वास घेतला. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी महत्वपूर्ण कामे पार पाडली 2014 ते 2017 या कालावधीत पर्रिकर यांनी संरक्षण मंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. यावेळी पाक व्याप्त काश्मीर वर केलेला पहिला वाहिला सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike), राफेल डिल (Rafale Deal), हे त्यांच्या कार्याचे लक्षवेधी भाग ठरले. वयाच्या 63व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले.
शीला दीक्षित
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे 20 जुलै 2019 वयाच्या 81 व्या वर्षी कार्डियाक अरेस्टमुळे देहावसान झाले. शीला यांनी दिल्लीत सर्वात अधिक म्हणजेच तब्बल 15 वर्षे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला होता. 1988 मध्ये पहिंल्यादा निवडून आल्यावर त्यांनी तीन टर्म साठी ही जबाबदारी पार पाडली. तर लोकसभा निवडणूक 2019 च्या आधी त्यांची दिल्ली काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती.
अरुण जेटली
भाजप नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे वयाच्या 66व्या वर्षी 24 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले. AIIMS रुग्णालयातच जेटली यांनी शेवटचा श्वास घेतला. राजकीय वर्तुळात त्यांना बुद्धीने अत्यंत तल्लख म्ह्णून पाहिले जात होते. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील पहिल्या टर्म मध्ये जेटली यांनी अर्थमंत्री म्ह्णून महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. नोटबंदी, जीएसटी हे त्याच काळात घेतलेले निर्णय आहेत. राजकारणाशिवाय त्यांनी सर्वोच्च न्यालयातील वरिष्ठ वकील म्ह्णूनही काम पाहिले होते.
जॉर्ज फर्नांडिस
माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे वर्षाच्या सुरुवातीलाच 29 जानेवारी 2019 रोजी निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 88 वर्षे होते. त्यांना प्रदीर्घ काळापासून अल्झायमरचा त्रास होता, अटळ बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधेय फ़र्नांडिस यांनी संरक्षण मंत्री म्ह्णून कार्यभार स्वीकारला होता. समता पार्टीचे संस्थापक आणि जनता दलाचे पुढारीचे नेते, एक उत्तम पत्रकार म्ह्णून त्यांची ओळख होती. 1975 साली आणीबाणीच्या काळात त्यांना अटक झाली असताना 1977 मध्ये तुरुंगातून निवडणूक लढवताना सुद्धा फर्नांडिस यांचा विजय झाला होता. वी. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी मंगलोर आणि मुंबईला जोडणारा कोकण रेल्वे प्रकल्प सुरु केला होता.
राम जेठमलानी
ज्येष्ठ वकील आणि भाजप नेते राम जेठमलानी यांचे 8 सप्टेंबर 2019 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. जेठमलानी यांनी राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या हत्येतील आरोपींसोबतच चारा घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव यांची देखील केस लढवली आहे. याप्रमाणेच संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरू ते सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणातील अमित शहा यांची केस राम जेठमलानी यांनी लढवली आहे.
टी. एन. शेषन
केंद्रीय निवडणूक आयोगाचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन शेषन यांचे 10 नोव्हेंबर रोजी कार्डियाक अरेस्टमुळे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. भारतीय निवडणुकांच्या बाबतीत अनेक आमूलाग्र बदल घडवून आणणारे आयुक्त म्ह्णून शेषन यांची ओळख आहे. 1996 मध्ये त्यांना मॅगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्त झाल्यानंतर 1997 मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढली होती ज्यात माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी त्यांचा पराभव केला होता
राजकारणात आपल्या कामाने एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या या जनतेच्या नेत्यांना वर्षाच्या सरतेशेवटी भावपूर्ण श्रद्धांजली!