Photo Credit- X

Who Will Replace Arvind Kejriwal: 'मी दोन दिवसांनी दिल्‍लीच्‍या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे', अशी घोषणा करत अरविंद केजरीवाल पुन्‍हा एकदा चर्चेत आले. त्‍यांच्‍या या घोषणेनंतर आता दिल्‍लीच्‍या मुख्‍यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली आहे. राजीमान्याची घोषणा करताना केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी म्हटले की जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसणार नाही. दिल्ली विधानसभा विसर्जित होणार नाही. माझ्या जागी दुसरे मुख्यमंत्री बसतील, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले होते. (हेही वाचा:Arvind Kejriwal Resignation: अरविंद केजरवाल यांचा राजीनामा; दोन दिवसात अधिकृत घोषणा )

आतिशी मारलेना

दिल्‍ली मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीत काही नेत्यांची नावे पुढे येत आहेत. यात आतिशी मारलेना यांचे नाव आघाडीवर आहे. त्‍या कालकाजी मतदारसंघाच्‍या आमदार आहेत. सध्‍या त्‍यांच्‍याकडे शिक्षण, उच्च शिक्षण, वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधाकाम, पाणी, वीज, सेवा, दक्षता, जनसंपर्क आदी खाती आहेत. त्या नेहमी प्रसारमाध्यमांसमोर त्यांची मते उधडपणे मांडतात.

सौरभ भारद्वाज

आतिशी यांच्यासोबत सौरभ भारद्वाज यांचेही नाव आघाडीवर आहे. ते दिल्लीतील ग्रेटर कैलास मतदारसंघाचे आमदार आहेत. सध्‍या ते आपच्‍या सरकारमध्‍ये आरोग्य, शहरी विकास आणि पर्यटन मंत्री आहेत. सौरभ भारद्वाज हे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्तेही आहेत.

राघव चड्ढा

आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राजकीय घडामोडी समितीचे सदस्य, राघव चड्ढा हे पक्षाचे राज्यसभा खासदार आहेत. ते आप पक्षाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत. राघव चड्ढा यांनी यापूर्वी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम केले आहे. ते पक्षाच्या स्थापनेपासून आपमध्ये आहेत. ते राजिंदर नगरचे आमदार आहेत. 2022 च्या राज्य निवडणुकीत पंजाबमध्ये आपच्या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 35 वर्षीय राघव चड्ढा हे देशातील सर्वात प्रमुख तरुण राजकारण्यांपैकी एक आहेत.

कैलाश गेहलोत

कैलाश गेहलोत यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. व्यवसायाने वकील असलेले गहलोत हे आप सरकारच्या वरिष्ठ सदस्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे वाहतूक, वित्त आणि गृह व्यवहार यांसारखी प्रमुख खाती आहेत. 50 वर्षीय नेते 2015 पासून दिल्लीच्या नजफगढ मतदारसंघाचे आमदार आहेत. कैलाश गेहलोत यांनी दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आहे. 2005 ते 2007 दरम्यान उच्च न्यायालय बार असोसिएशनमध्ये सदस्य कार्यकारी म्हणून काम केले आहे.

या यादीत आपचे आमदार कुलदीप कुलदीप कुमार यांचेही नाव आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याही नावाची चर्चा आहे. आमदारांची बैठक होणार असून मुख्यमंत्री कोण होणार याबाबत निर्णय घेतला जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे आता या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.