Rafale Deal: राफेल विमान खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी ही विरोधकांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळून लावली. त्यामुळे केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व पूरावे देशासमोर ठेवावेत. तसेच, त्यांनी कोणत्या आधारावर सरकारवर आरोप केले हेसुद्धा जनतेला सांगवे. राहुल गांधी यांनी स्वत:च्या आणि पक्षाच्या फायद्यासाठी राफेल मुद्द्यावरुन जनतेची दिशाभूल केली त्यामुळे त्यांनी जनतेची माफी मागावी असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.
अमित शाह यांनी पुढे म्हटले आहे की, देशातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे चौकीदार चोर आहे हे देशातील जनता कधीच मान्य करणार नाही. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर घोटाळा केल्याचा आरोप केला. मात्र, राजयकीय फायदा-नुकसान ही वेगळी बाब आहे. मात्र, देशाच्या सुरक्षिततेशी संबंधीत मुद्द्यावर अशा प्रकारचे आरोप व्हायला नको होते. राहुल यांनी याबाबत देशाची माफी मागावी असा पुनरुच्चारही शाह यांनी या वेळी केला. (हेही वचा, राफेल विमान खरेदीत कोणताही गैरव्यवहार नाही: सर्वोच्च न्यायालय)
मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तिसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी राफेल व्यवहाराचा मुद्दा प्रचारात लाऊन धरला होता. त्याची मोठी किंमत भाजपला मोजावी लागली. या पाचही राज्यात भाजपचा दारुण पराभव झाला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राफेलसंबधी आलेल्या सर्व याचिकांवर आपला निकाल शुक्रवारी दिला. या निर्णयात राफेल विमान खरेदीत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नाही. तसेच, विमानांची किंमत जाणून घेणे हे न्यायालयाचे काम नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजपच्या गोटात उत्साहाचे वारे आले असून, काही वेळात आमित शाह यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. या वेळी बोलताना सुर्याकडे कितीही चिखल फेकला तरी, तो फेकणाऱ्याच्याच अंगावर उडतो असा टोलाही शाह यांनी काँग्रेसला लगावला.