माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांचे काल (6 ऑगस्ट) रोजी निधन झाले. त्यानंतर राजकीय वर्तुळात शोकाकूल वातावरण असून बॉलिवूड सेलिब्रेटींसह सामान्य जनताही हळहळ व्यक्त करत आहे. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज दुपारी 3 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी देशातील अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. (अनुष्का शर्मा, करण जोहर, रितेश देशमुख यांच्या सह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची ट्विटरच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली)
धडाडीच्या नेत्या असलेल्या सुषमा स्वराज यांच्याबद्दल राजकीय कारर्कीदीशिवाय आपल्याला अनेक गोष्टी ठाऊक नसतील. त्यापैकीच एक म्हणजे त्यांची लव्ह स्टोरी. (सुषमा स्वराज यांच्या जीवनात का होते रंगांना विशेष महत्व; जाणून घ्या 10 आश्चर्यकारक गोष्टी)
कुटुंबियांचा विरोध तरीही...
सुषमा स्वराज यांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यासाठी त्यांना कुटुंबियांचा विरोध देखील सहन करावा लागला होता. मात्र हार न मानता सुषमा यांनी आपल्या कुटुंबियांची मनधरणी केली आणि लग्नासाठी होकार मिळवला.
असा घडला प्रेमाचा प्रवास
स्वराज कौशल यांच्याशी चंदीगडच्या लॉ कॉलेजमध्ये असताना सुषमा स्वराज यांची ओळख झाली. मग मैत्री ते प्रेम असा प्रवास घडला आणि अखेर 13 जुलै 1975 साली या दोघांनीही विवाह केला. स्वराज कौशल हे सुप्रीम कोर्टात वकील होते. त्यानंतर त्यांना देशातील सर्वात तरुण अॅडव्होकेट जनरल म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर 1990 ते 1993 या काळात ते मिझोरमचे राज्यपाल होते.
सुषमा स्वराज यांनी ज्या काळी प्रेमविवाह केला तेव्हा समाजातील वातावरण प्रेमविवाहास फारसे अनुकूल नव्हते. त्यामुळे स्वाभाविकच घरातून प्रेमविवाहास परवानगी मिळणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीतही सुषमा यांनी हार न मानता कुटुंबियांची परवानगी मिळत स्वराज कौशल यांच्याशी लग्नगाठ बांधली.