आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी (Lok Sabha Polls) भारतामध्ये प्रमुख विरोधक एकत्र आले होते. त्यांनी मोदी सरकारला उलथवून लावण्यासाठी एकजूट दाखवली होती. पण ही एकजूट ते फार काळ टिकवू शकले नाहीत. आज काही वेळापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपण भाजपाचा एकट्याने सामना करू असे घोषित केल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी देखील लोकसभेसाठी पंजाबमध्ये AAP कॉंग्रेस सोबत जाऊ शकत नसल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे ही 'इंडिया' मध्ये फूट आहे का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
भगवंत मान यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये 'आप' स्वबळावर 13 लोकसभेच्या जागा जिंकू शकते असा विश्वास बोलून दाखवला आहे. केजरीवाल यांचादेखील याला पाठिंबा असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या इंडिया आघाडी मध्ये तिकीट वाटपावरून मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यावरूनच आता ही स्वबळाची भाषा होत असल्याचं समोर येत आहे. आप आणि कॉंग्रेस यांच्यामध्ये तिकीट वाटपाची चर्चा यशस्वी न झाल्याने त्यांच्याकडून आता या स्वबळाच्या निर्णयाची घोषणा झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अपेक्षित वाटाघाटी होत नसल्याने त्यांनी बोलणी थांबवली होती. दरम्यान सुरूवातीपासून इंडिया आघाडीमध्ये विविध विचारधारेचे इतके पक्ष एकत्र कसे येणार यावरून चर्चा, खटके उडत असल्याच्या बातम्या येत होत्या.
No AAP alliance with Congress in Punjab for 2024 Lok Sabha polls: CM Mann
— Press Trust of India (@PTI_News) January 24, 2024
ममता बॅनर्जींचे मतभेद
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर त्यांच्याकडून आज ही घोषणा झाली. चौधरी यांनी ममता बॅनर्जींना संधीसाधू संबोधले आणि पक्ष त्यांच्या मदतीशिवाय लोकसभा निवडणूक लढवेल असे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे टीएमसीने काँग्रेसला दोन जागांची ऑफर दिल्याने त्यांच्यात तणाव निर्माण झाला.
पंजाब आणि पश्चिम बंगाल नंतर आता महाराष्ट्रातही लोकसभेसाठी ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉंग्रेस मध्ये तिकीटवाटप कसं होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहेत. महाराष्ट्रातही अद्याप जागावाटप जाहीर करण्यात आलेले नाही.